जामनेर | वार्ताहर | Jamner
जामनेर नगरपरिषद निवडणूकीतून काँग्रेस, राष्ट्रवादी (पवार गट), राष्ट्रवादी (अजित दादा गट) अशा तीन पक्षाच्या उमेदवारांनी शहरवासीयांना धक्का देत उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांच्या पत्नी साधना महाजन (Sadhana Mahajan) यांची बिनविरोध निवड झाली आहे.
निवडणूक प्रक्रियेत आतापर्यंत नगराध्यक्षासह एकूण सहा नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. यामुळे भाजपला मोठा राजकीय लाभ मिळाल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे. स्थानिक राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे मंत्री गिरीश महाजन यांच्या राजकीय रणनीतीमुळेच हे शक्य झाल्याचे बोलले जात असून, त्यांच्या प्रभावाबाबत विविध स्तरावर चर्चा सुरू आहे. साधना महाजन यांच्या बिनविरोध (Unopposed) निवडीमुळे गिरीश महाजनांचा करिष्मा पुन्हा एकदा ठळक झाल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, या निवडणुकीत जामनेर नगरपरिषदेतील (Jamner Nagarparishad) २६ नगरसेवक आणि १ नगराध्यक्षा निवडण्यासाठी मतदात्यांना मतदान करायचे होते. त्यापैकी आतापर्यंत १ नगराध्यक्ष व ६ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. आता २० जागांवर निवडणूक प्रक्रिया सुरू राहणार असून, उद्यापर्यंत कोणत्या नवीन राजकीय घडामोडी घडतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.




