Tuesday, September 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजEknath Khadse : "शरद पवारांनी साथ दिली नसती तर..."; आमदार एकनाथ खडसेंचे...

Eknath Khadse : “शरद पवारांनी साथ दिली नसती तर…”; आमदार एकनाथ खडसेंचे अमृत महोत्सवी सोहळ्यात विधान

जुन्या आठवणींना दिला उजाळा

जळगाव | Jalgaon

जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील (Muktainagar Taluka) कोथळी गावात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा अमृत महोत्सवी (७५ वा वाढदिवस) सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी राजकीय (Politics) मतभेद बाजूला ठेवत सर्वपक्षीय दिग्गजांची उपस्थिती कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली. या सोहळ्यात आपल्या ७५ वर्षांच्या जीवनप्रवासाचा आणि राजकीय कारकिर्दीचा पट मांडताना नाथाभाऊ कमालीचे भावुक झाले होते.

- Advertisement -

ग्रामपंचायतीपासून सुरू झालेला संघर्षमय प्रवास

आपल्या राजकीय प्रवासाला उजाळा देताना खडसे म्हणाले की, “कोथळीसारख्या (Kothali) छोट्या गावातून माझ्या प्रवासाला सुरुवात झाली. १९७८ मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत आमचे पॅनल अवघ्या एका मताने पराभूत झाले होते. परंतु, हार न मानता मी संघर्ष सुरू ठेवला. त्यानंतर सरपंच, पंचायत समिती सदस्य आणि १९९० मध्ये पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश केला. जनतेने मला सलग सात वेळा विधानसभेत पाठवले. भाजप वाढवण्यासाठी कै. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि पांडुरंग फुंडकर यांनी दिलेली साथ, तसेच जलसंपदा मंत्री म्हणून तापी व गोदावरी खोरे महामंडळाच्या माध्यमातून केलेले सिंचनाचे काम या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

शरद पवारांचे मानले आभार मानत सध्याच्या राजकारणावर व्यक्त केली खंत

खडसे पुढे म्हणाले की, “राजकीय अडचणींच्या काळात आणि संकटसमयी शरद पवार (Sharad Pawar) यांनी मला साथ दिली व उजेडात आणले. त्यांनी वेळ प्रसंगी आशीर्वाद दिले नसते, तर मी पडद्यामागे किंवा अंधारात फेकला गेलो असतो,” अशा शब्दांत त्यांनी शरद पवारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.तसेच कौटुंबिक दुःखाचा उल्लेख करत ते म्हणाले, “एकुलत्या एका मुलाच्या निधनानंतर मी पूर्णपणे खचलो होतो, पण जनता आणि कुटुंबाच्या ताकदीमुळेच पुनश्च उभारी घेऊ शकलो,” असे खडसे यांनी सांगितले. दरम्यान, महाजन-मुंडे यांच्या काळातील राजकारण आणि आजचे राजकारण यात मोठा फरक पडल्याची खंत व्यक्त करत त्यांनी सध्याच्या राजकीय वातावरणावर वेदना व्यक्त केल्या.

मंदिराचा निधी अडवण्याचे पाप केले नाही

यावेळी ते म्हणाले की,”मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मुक्ताई मंदिरासाठी २५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यातील ९ कोटी रुपये मिळाले आहेत. मात्र, उर्वरित निधी मिळालेला नाही. मंदिराचा निधी अडवण्याचे पाप मी आतापर्यंत केलेले नाही. सात वर्षापासून मुक्ताई मंदिराला निधी नाही. कोण आले आणि कोण गेले याची मला चिंता नाही. मात्र, जनतेचा आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. मी चुकलो असेल तर कुणाला दुखवलं तर चुका सुधारू. वर्षानुवर्षे विधानसभेत मला आपण निवडून दिले आणि प्रेम देखील दिले”, असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले.

जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले की, “एकनाथ खडसे हे एक सक्षम विरोधी पक्षनेते होते. त्यांनी कोणत्याही कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमीशिवाय स्वबळावर आपला ठसा उमटवला. रोहिणीताई आणि रक्षाताई त्यांचा हा वारसा पुढे नेहत आहेत. तर दिलीप वळसे पाटील यांनी “नाथाभाऊ म्हणजे सरकारवर तुटून पडणारा आणि आक्रमक मांडणी करणारा संघर्षमय नेता आहे”, असे म्हटले.

सर्वपक्षीय नेत्यांची मांदियाळी आणि कौतुकाचा वर्षाव

या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मंत्री रक्षा खडसे, माजी मंत्री जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल देशमुख, राजेश टोपे, आणि हर्षवर्धन पाटील यांसारखे दिग्गज उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेचा लवकरच निवडणूक कार्यक्रम

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गेल्या काही महिन्यांपासून प्रशासकांच्या ताब्यात असलेल्या अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादीचा टप्पा पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष...