नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महानगरपालिकेतील (Municipal Corporation) १० स्वीकृत नगरसेवक पदांच्या नियुक्तीची प्रक्रिया आज (बुधवार ४ नोव्हेंबर) रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत विविध राजकीय पक्षांच्या गटनेते महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री (Manisha Khatri) यांच्याकडे आपले उमेदवारांचे अर्ज सादर करतील. मात्र, अर्ज दाखल होण्याच्या पूर्वसंध्येसच नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडल्या असून नाट्यमय वळणे समोर येत आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर आणि राष्ट्रपतींच्या नाशिक दौऱ्यामुळे लांबणीवर पडलेली ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. १० जागांपैकी भाजपच्या वाट्याला ६, शिंदे सेनेला २ आणि ठाकरे सेना-काँग्रेस आघाडीला २ जागा मिळाल्या आहेत.
आघाडीच्या वाट्याला आलेल्या २ जागांपैकी १ जागा मिळावी अशी काँग्रेसची (Congress) सुरवातीपासूनच मागणी होती. मात्र, ठाकरे सेनेचे गटनेते केशव पोरजे यांनी मंगळवारी आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेऊन हेमंत दत्ता गायकवाड आणि बाबा गायकवाड यांच्या नावांचे अर्ज सादर केले. विशेष म्हणजे हे दोन्ही नगरसेवक ५ वर्षांचा पूर्ण कार्यकाल पूर्ण करतील अशी भूमिका ठाकरे सेनेने घेतली आहे. ठाकरे सेनेच्या या एकतर्फी निर्णयामुळे काँग्रेस नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, आगामी राजकीय समीकरणांवर उमटण्याची शक्यता आहे.
शिंदेंसेनेत १ वर्षाचा फॉर्म्युला तर भाजपची नावे गुलदस्त्यात
शिंदेंसेनेतर्फे (Shinde Shivsena) २ जागांसाठी तब्बल ७४ इच्छुक असून गटनेते अजय बोरस्ते यांनी प्रत्येक उमेदवाराला १ वर्षाचा कार्यकाळ देण्याचा फॉर्म्युला निश्चित केल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, भाजपच्या ६ जागांसाठी पक्षांतर्गत मोठी रस्सीखेच सुरू असून गटनेते ॲड. श्याम बडोदे मुंबईत असून वरिष्ठांशी चर्चा करून शेवटच्या क्षणी नावे जाहीर केली जातील. ठाकरे सेनेच्या भूमिकेमुळे दुखावलेल काँग्रेसचे काही नगरसेवक आणि ठाकरे गटातील काही असंतुष्ट नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे. यातील काही नगरसेवकांनी मुंबईत जाऊन पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्याचे समजते, ज्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर नाशिक महापालिकेत मोठे राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोण काय म्हणाले?
नोंदणीकृत गट किंवा आघाडीला निर्धारित झालेल्या जागांच्या संख्येनुसार अर्ज स्वीकारले जातील. अर्जांची छाननी करताना कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधित उमेदवारांना ती दुरुस्त करण्याची नियमानुसार संधी दिली जाईल.
मनीषा खत्री (आयुक्त, महापालिका)
स्वीकृत नगरसेवकांना एक वर्षाचा कार्यकाळ देऊन बदल करण्याबाबत कायद्यात स्वतंत्र तरतूद नाही. परंतु, नियुक्त नगरसेवकाने स्वतःहून राजीनामा दिल्यास तो स्वीकारून रिक्त जागेवर नियमानुसार नवीन नियुक्ती करता येते.
संजय नेरकर (नगरसचिव, महापालिका)
आघाडीच्या वाट्याला आलेल्या दोन्ही स्वीकृत नगरसेवकपदांसाठी हेमंत दत्ता गायकवाड आणि बाबा गायकवाड या दोन नावांचे अर्ज आम्ही महापालिका आयुक्तांकडे सादर केले आहेत. आमच्या पक्षाकडून हे दोन्ही नगरसेवक सलग पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी राहतील.
(केशव पोरजे, गटनेते, उद्धव बाळासाहेब ठाकरे)
आमच्या पक्षाने स्वीकृत नगरसेवकांसाठी प्रत्येकी एक वर्षाचा कार्यकाळ देण्याचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. या दोन जागांसाठी एकूण ७४ इच्छुकांची नावे वरिष्ठांकडे पाठवून अंतिम मान्यतेनंतर अर्ज दाखल केले जातील.
अजय बोरस्ते (गटनेते, शिवसेना शिंदे गट)
भाजपकडून ६ स्वीकृत नगरसेवकपदांसाठी ६ अर्ज महापालिका आयुक्तांकडे वेळेत दाखल केले जातील. वरिष्ठांकडून नावे अंतिम करण्याचे काम सुरू असून अंतिम नावे लवकरच स्पष्ट होतील.
ॲड. श्याम बडोडे (गटनेते, भाजप)




