नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
दिल्लीतील जंतर-मंतर येथे CJP च्या आंदोलनापूर्वी यूट्यूबर ध्रुव राठी याला गुरुग्राममधील निवासस्थानातून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बातमी समोर आली आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. आंदोलनस्थळाजवळही पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुग्राममधील सेक्टर ५६ मधील ध्रुव राठीच्या निवासस्थानातून त्याला ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे. शुक्रवारी रात्रीच दिल्ली पोलिसांचे पथक गुरुग्राममध्ये पोहोचले होते. आज सकाळी पोलिसांनी दार ठोठावले असता ध्रुव राठीच्या आईने दार उघडले. त्यानंतर पोलिसांनी घरात शिरून ध्रुव राठीला ताब्यात घेतले.
तर याबाबत , CJP च्या एक्स (X) हँडलवर करण्यात आलेल्या एका पोस्टनुसार, ध्रुव राठी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हुकूमशहाला अशा तरुणांची प्रचंड भीती वाटते, जो त्याच्या चुकीच्या कृत्यांवर प्रश्न उपस्थित करतात आणि गप्प राहण्यास नकार देतात!, असंही पोस्टमध्ये म्हटलं आहे.
Dhruv Rathee has been detained.
The Dictator is TERRIFIED of young people who question its wrongdoings and refuse to stay silent!— Cockroach Janta Party – CJP (@Cockroachisback) October 10, 2026
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांचे एक पथक सकाळी 7:48 वाजता सेक्टर-56 मधील केंद्रीय विहार येथील त्याच्या निवासस्थानी पोहोचले. ध्रुव राठीच्या आईने दरवाजा उघडताच पोलीस कर्मचारी घरात दाखल झाले. एका हिंदी वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांचे सुमारे 50 जणांचे पथक आधीपासूनच रात्रीपासूनच त्याच्या घराबाहेर तैनात होते. त्यानंतर पोलिसांनी ध्रुव राठीला आपल्यासोबत नेले. मात्र, त्याला नेमक्या कोणत्या प्रकरणात किंवा गुन्ह्याखाली ताब्यात घेण्यात आले आहे, याबाबतची कोणतीही अधिकृत पुष्टी आणि सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.
ध्रुव राठीने शुक्रवारी रात्री इंडिया गेटच्या बाहेर एक व्हिडीओ चित्रीत केला होता. मी उद्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्याने सांगितले होते. “आमच्या पंतप्रधानांनी जय्यत तयारी केली आहे. ५० हून अधिक मेट्रो स्टेशन्स बंद केले आहेत. ट्रेन, बस बंद आहेत. आमच्या आंदोलनामुळे दिल्लीत जवळपास लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण केली आहे. एका बाजूला भाजपाचा आयटी सेल सांगतो की, आमच्या आंदोलनात कुणीही येणार नाही, गर्दी होणार नाही. मग दिल्लीत एवढा बंदोबस्त कशासाठी केला आहे?”, असा सवाल ध्रुव राठीने उपस्थित केला होता.
संपादकीय : १० ऑक्टोबर २०२६ – ऐन सणासुदीत महागाईचे संकट
दरम्यान ८ ऑक्टोबर रोजी बंगळुरू येथील फ्रीडम पार्क येथे झालेल्या कॉक्रोच जनता पार्टी आंदोलनात ध्रुव राठीने हजेरी लावली होती. आंदोलनात सहभागी झालेल्या ध्रुव राठी यांनी यावेळी म्हटले, “मी पहिल्यांदाच आंदोलनात सहभागी झालो आहे. मी काल बंगळुरूत आलो, तेव्हा सोशल मीडियावर ध्रुव राठी सरकार उलथवून लावायला येत आहे, अशा पोस्ट व्हायरल झाल्याचे दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटत असेल की, माझा त्यांच्याशी काही वैयक्तिक वाद आहे; मात्र वस्तुस्थिती अशी आहे की, संपूर्ण देशालाच आता त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.”




