Saturday, April 18, 2026
HomeनगरAhilyanagar : अहिल्यानगर-नाशिकवरील ‘समन्यायी’चे संकट टळले

Ahilyanagar : अहिल्यानगर-नाशिकवरील ‘समन्यायी’चे संकट टळले

अखेर जायकवाडी धरणातील 10 जुलैलाच 65 टक्के पाणीसाठा

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

जायकवाडीत काल दुपारी 2 वाजता उपयुक्त साठा 65 टक्के झाला. त्यामुळे समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यांना जायकवाडीला पाणी सोडण्याचा प्रश्न मिटला आहे. यावर्षी विक्रमी वेळेत म्हणजे 9 जुलै 2025 रोजी जायकवाडी धरणातील उपयुक्त पाणीसाठा 65 टक्के म्हणजे 50 टीएमसी झाला आहे. जायकवाडीची एकूण पाणी साठवण क्षमता 102.65 टीएमसी असून त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा 76.65 टीएमसी आहे. मागील वर्षी या तारखेला उपयुक्त पाणीसाठा फक्त 4.5 टक्के होता. या पार्श्वभूमीवर समन्यायी कायद्यानुसार यावर्षी जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा विषय संपला आहे.

- Advertisement -

गेल्या सलग सात वर्षांत, 2023 चा अपवाद वगळता, समन्यायी कायद्यानुसार जायकवाडीला पाणी सोडण्याची वेळ आली नाही. यापूर्वी 2012 पासून 2025 पर्यंतच्या 14 वर्षांत 2012, 2013, 2014, 2015, 2018 आणि 2023 मध्ये पाणी सोडण्यात आले होते. घाटमाथ्यावर मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी 1 जूनपासून आजपर्यंत जवळपास पाचपट पाऊस झाल्याने पावसाळ्याच्या पूर्वार्धात जायकवाडीकडे मोठ्या प्रमाणात पाणी गेले. गोदावरी नदीत नांदुरमधमेश्वर बंधार्‍यावरून 28 टीएमसी तसेच प्रवरा नदीत ओझर बंधार्‍यावरून 3 टीएमसी असे एकूण 31 टीएमसी पाणी आजपर्यंत वाहून गेले आहे. सध्या नांदुर मधमेश्वर बंधार्‍यावरून 32,690 क्युसेक्स तसेच ओझर बंधार्‍यावरून 12,613 क्युसेक्स प्रवाह वाहत आहे. गोदावरी नदीतील कमालपूर बंधार्‍यातून 38,737 क्युसेक्स तसेच प्रवरा नदीतील मध्यमेश्वर (नेवासा) बंधार्‍यातून 17,042 असे एकूण 55,779 क्युसेक्स पाण्याची जायकवाडी धरणात आवक होत आहे.

जायकवाडीत चोवीस तासांत सरासरी 4 टीएमसी पाणी येत आहे. आजमितीला नाशिकमधील धरणात 71 टक्के उपयुक्त पाणीसाठा असून मागील तो फक्त 13 टक्के होता. धरण सुरक्षिततेच्या अनुषंगाने तयार केलेल्या धरण जलाशय परिचालन सूचीनुसार दर महिन्याच्या प्रत्येक पंधरवड्यात एकूण क्षमतेच्या अपेक्षित टक्के असलेला पाणीसाठा धरणात साठवून ठेवून उर्वरित पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर जलाशय परिचालन सूचीनुसार जायकवाडी धरणातून येत्या आठ/दहा दिवसात गोदावरी नदीत पाणी सोडावे लागेल.

दरम्यान, काल सायंकाळी 6 च्या आकडेवारीनुसार जायकवाडी जलाशयात 57360 क्युसेकने आवक होत होती. या धरणात 66.39 टक्के पाणीसाठा झाला होता. यात उपयुक्त साठा 50.91 टीएमसी तर उपयुक्त सह मृतसाठा 76.98 टीएमसी इतका झाला आहे. पावसाचा जोर ओसरला असल्याने नाशिक जिल्ह्यातील धरणांचे विसर्ग घटविण्यात आले आहेत. त्यामुळे काल सायंकाळी सहा वाजता नांदुर मधमेश्वर बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत 12620 क्युसेकने विसर्ग सुरू होता. या बंधार्‍याच्या दिशेने दारणा धरणातून 1100 क्यूसेक, गंगापूरमधून 2205 क्यूसेक, पालखेड 696 क्यूसेक, पुणेगाव 550 क्यूसेक, भोजापूर 539 क्यूसेक, भावली 481 क्यूसेक, भाम 1245 क्यूसेक, वालदेवी 599 क्यूसेक, आळंदी 243 क्यूसेक, कश्यपी 1000 क्यूसेक, कडवा 804 क्यूसेक, करंजवन 630 क्यूसेकने विसर्ग सुरू आहेत. वाकी, मुकणे धरणांचे विसर्ग बंद करण्यात आले आहेत.

समन्यायी कायद्यानुसार यावर्षी जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा विषय संपला आहे. घाटमाथ्यावर मागील वर्षाच्या तुलनेत पाचपट पाऊस झाला असला तरी घाटमाथा परिसर वगळता अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्याच्या उर्वरित भागात मात्र समाधानकारक पाऊस झालेला नाही. भुजल पातळीत वाढ नाही. मागील वर्षाच्या तुलनेत फक्त 40 टक्क्याच्या आसपास पाऊस झाला असून त्यावर खरिपाच्या बहुतांश पेरण्या झाल्या आहेत. परंतु पावसाचा दिर्घकालीन खंड पडल्याने पिकांना पाण्याचा ताण बसला. त्यामुळे गोदावरी तसेच निळवंडे कालव्यांना पाणी सोडण्याची आवश्यकता आहे.
-उत्तमराव निर्मळ, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता.

ताज्या बातम्या

शेतकर्‍यांचे शोले स्टाईल आंदोलन

0
येवला | प्रतिनिधी Yeola ७/१२ उताऱ्यावरील एमआयडीसीचा (MIDC) बेकायदेशीर शिक्का तात्काळ हटवावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी येवला प्रांताधिकारी कार्यालयासमोर आज, धरणे आंदोलन केले. तर प्रांतअधिकारी उपलब्ध...