अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जायकवाडी प्रकल्पातील पुनर्वसित गावांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महसूल आणि जलसंपदा विभागाने एकत्रित सर्व्हेक्षण करून एक महिन्यात प्रस्ताव सादर करण्याचा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. जायकवाडी प्रकल्पात पुर्नवसित झालेल्या शेवगाव, नेवासा आणि गंगापूर तालुक्यातील गावांच्या समस्याबद्दल मंत्रालयात मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आ. मोनिका राजळे आ. रमेश बोरनारे आ. विठ्ठलराव लंघे, आ. अक्षय कर्डिले, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्यासह जलसंपदा आणि मदत व पुनर्वसन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पुर्नवसित गावात बुडीत क्षेत्र किती आहे. असलेल्या किती जमिनीमध्ये पाणी जाते याबाबतचा ड्रोन सर्व्हे करून घेण्याचे सूचित करून, जलसंपदा व महसूल विभागाने गावांमध्ये जनसुनावणी घेवून ज्यांच्या जमिनी आहेत त्या शेतकर्यांची माहिती महिनाभरात संकलित करून त्याचा प्रस्ताव शासनाने पाठवावा, असे आदेश विखे पाटील यांनी दिले. जमीन अदलाबदल, भोगावटा वर्ग एक करणे, तसेच पुर्नवसित गावात नसलेल्या सुविधांचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घ्यावा व यासंदर्भात स्वतंत्र बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले.
मदत व पुनर्वसन मंत्री पाटील यांनी जमीनीचा सर्व्हे आल्यानंतर त्या गावातील प्रश्नांच्या संदर्भात निर्णय करण्याची ग्वाही दिली. शेतकर्यांच्या समस्या मांडतांना आ. राजळे यांनी जायकवाडी प्रकल्प आधी झाला. त्यानंतर झालेल्या कायद्यामुळे शेतकर्यांची मोठी समस्या निर्माण झाल्याचे सांगितले. आ. लंघे यांनी पुर्नवसित गावांच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. या गावांना न्याय मिळेल असे निर्णय व्हावेत आशी अपेक्षा व्यक्त केली.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाबाबत बैठक
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच या प्रश्नांच्या सर्वंकष अभ्यासासाठी आणि योग्य तो मार्ग काढण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीत प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधीचाही समावेश करण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले. या बैठकीस आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार अक्षय कर्डीले आदी उपस्थित होते.




