Thursday, June 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजडॉक्टरांचे कार्य देवदूतासारखे : डॉ. प्रवीण गेडाम

डॉक्टरांचे कार्य देवदूतासारखे : डॉ. प्रवीण गेडाम

दै.'देशदूत'तर्फे डॉक्टरांना 'जीवन संजीवन पुरस्कार प्रदान'

नाशिक | प्रतिनिधी Nashik

डॉक्टर त्यांचे सर्व रुग्ण व त्यांची नातेवाईकांच्या अपेक्षा विज्ञानाला असणाऱ्या मर्यादा या सर्व गोष्टी सांभाळत आजही समाजात अनेक डॉक्टर निस्वार्थपणे रुग्णसेवा करीत आहेत. डॉक्टर हा देव जरी नसला तरी देवदूताप्रमाणेच कार्य करीत असल्याचे प्रतिपादन विभागीय महसूल आयुक्त तथा सिहस्थ प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले. दैनिक ‘देशदूत’ आयोजित ‘जीवन संजीवन पुरस्कार २०२५’ वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

- Advertisement -

नाशिक-पुणे रोडवरील नाशिक्लब येथे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. अनेक नामवंत डॉक्टर सेवाभावी वृत्तीने वैद्यकीय सेवाकार्य करीत आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी नुकत्याच झालेल्या ‘डॉक्टर्स दिना’चे औचित्य साधून ‘जीवन संजीवन पुरस्कार’ सोहळा दै. ‘देशदूत’च्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या अंतर्गत पाच विविध ज्येष्ठ डॉक्टरांना ‘देशदूत जीवन गौरव’ तर विविध उपचार पद्धतीतील सोळा तज्ज्ञ डॉक्टरांना ‘जीवन संजीवन पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रति कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ यांसह ‘देशदूत’ वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष विक्रम सारडा, सल्लागार संपादक शैलेंद्र तनपुरे, जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे उपस्थित होते.

डॉ. गेडाम म्हणाले, अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून, तसेच विविध कारणांमुळे डॉक्टरांसोबत संवाद साधण्याची संधी मिळते. रात्री अपरात्री देखील रुग्णांसाठी डॉक्टर अविरतपणे सेवा देत असतात. बोटावर मोजणाऱ्या काहींमुळे सर्व क्षेत्राला बदनाम व्हावे लागते. असे असले तरी मोजके सोडून सर्वच डॉक्टर रुग्णसेवेचे महान कार्य करत आहेत. पुरस्कार मिळालेले सर्वांचे अभिनंदन करतांना डॉक्टरांच्या हातून होत असलेले सेवाकार्य अविरत सुरू राहावे यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रा.‎ डॉ. निकुंभ म्हणाले की, 1999 मध्ये नाशिक मध्ये येण्याचा योग आला. आयुर्वेद पॅथी असल्याने त्यातच रुग्णसेवा देत असताना नाशिक मधील सप्तशृंगी आयुर्वेदिक कॉलेजचे प्राचार्य, त्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून प्राध्यापक आणि आता आरोग्य विद्यापीठाचे प्र कुलगुरू अशी 25 वर्षांची प्रशासकीय सेवा झाली असली तरी आजही प्रॅक्टिस सुरू आहे. मला अ‍‍ॅलोपॅथी देखील येते मात्र मी आयुर्वेद मध्येच प्रॅक्टिस करत आहे. रुग्णसेवेसाठी ऍलोपॅथी व आयुर्वेद एकत्र आल्यास, रुग्णच्या दृष्टीने ही एक चांगली बाब ठरेल. नवा अभ्यासक्रम आरोग्य विद्यापीठात सुरू होणार आहे. ज्यात आयुर्वेद व अ‍‍ॅलोपॅथी ची पदवी घेतलेले डॉक्टर्स यांनी हा एक वर्षीय फेलोशिप कोर्स केल्यानंतर दुर्गम भागात निकडीच्या किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत रुग्णाचे प्राण वाचवायचे असल्यास कोणत्या चाचण्या किंवा तपासण्या, प्राथमिक उपचार करावेत याचे ज्ञान त्या वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्याला मिळून खऱ्या अर्थाने तो फॅमिली फिजिशियन म्हणून तयार होणार आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या सूचनेनुसार दोन वर्षाचा डिप्लोमा आणि तीन वर्षाचा पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम आरोग्य विद्यापीठातर्फे सुरू होणार आहे. सुरुवातीला शैलेंद्र तनपुरे यांनी प्रास्ताविक केले.

पुरस्कार प्राप्त डॉक्टरांच्या वतीने सन्मानाला उत्तर देताना डॉ. अरुण थोरात म्हणाले, या ठिकाणी झालेल्या सन्मानामुळे अधिकाधिक उत्तम कार्य करण्याची ऊर्जा मिळाली असून देशदूतने केलेला सन्मान हा अविस्मरणीय क्षण आहे. हा पुरस्कार एका डॉक्टरांचा नसून हा सर्व वैद्यकीय व्यवसायाचा गौरव आहे. सिन्नर तालुका व परिसरातील नागरिकांनी रुग्णांनी जो विश्वास ठेवून सेवेची संधी दिली त्यामुळे पुरस्कारास प्राप्त झालो. सध्या डॉक्टरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे मात्र काही जण सोडल्यास बाकी सर्वजण प्रामाणिकपणे वैद्यकीय सेवा करत आहेत.

कार्यक्रमाच्या शेवटी जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

याप्रसंगी नाशिक बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अ‍‍ॅड वैभव शेटे, डॉ.अभिजीत चांदे, नावाचे अध्यक्ष प्रवीण चांडक, आरोग्य विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे, डॉ. वृषाली पाटील, सहायक जाहिरात महाव्यवस्थापक (शहर) मिलिंद वैद्य, सहायक जाहिरात महाव्यवस्थापक (ग्रामीण) सचिन कापडणी, कॉर्पोरेट सहायक महाव्यवस्थापक संदीप राऊत, मार्केटिंग ऑफिसर समीर पराशरे, भगवान जाधव, आनंद कदम, आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विलास पाटील, नितीन गांगुर्डे, संतोष गिरी, प्रशांत अहिरे, प्रकाश मोरे यांनी मेहनत घेतली.

जीवन गौरव पुरस्कार
डॉ. अनिल मर्चेंट, मालेगाव, नाशिक
डॉ. विजया सुळे, नाशिक
डॉ. के. डी. बुवा, नाशिकरोड, नाशिक
डॉ. विजय बागरेचा, लासलगाव, नाशिक
डॉ. विश्वास देशपांडे, दिंडोरी, नाशिक

जीवन संजीवन पुरस्कार
सह्याद्री सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक
श्री साई मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, निफाड
डॉ. नानासाहेब खरे, नाशिक
डॉ. अजित खालकर, सिन्नर
डॉ. ज्ञानेश निकम, नाशिक
डॉ. राहुल वैद्य, नाशिक
डॉ. अरुण थोरात, सिन्नर
डॉ. महेश मांगुळकर, नाशिक
डॉ. सत्यजित सोनजे, नाशिक
डॉ. संदीप गोसावी, दिंडोरी
डॉ. हितेश पाटील, नाशिक
डॉ. भारत अहिरे, नाशिक
डॉ. दिनेश बागुल, नाशिक
डॉ. योगिनी बागुल, नाशिक
डॉ. नंदकुमार पाटील, कळवण
डॉ. प्रशांत पिंगळ, दिंडोरी
डॉ. निलेश लोढा, नाशिक
डॉ. अनिल चौधरी, नाशिक
डॉ. निलेश निकम, नाशिक

वैद्यकीय संशोधनाच्या कक्षा रुंदवणार
प्रत्येक पॅथीचा समाजासाठी काय उपयोग होऊ शकतो यासाठी संशोधन होणे गरजेचे आहे. यासाठी विद्यार्थी व शिक्षकांसाठी एसटीआरजी ग्रँट सुरू केली आहे. पीएचडी सारखे कोर्सेस जे आधी शंभर दिवस अनिवार्य होते ते पूर्ण वेळ सुरू करण्यात आले आहे. पूर्णवेळ अभ्यासक्रमात विद्यार्थ्याला विद्यापीठात राहून संशोधन करता येईल यासाठी त्याला प्रतिमहिना चाळीस हजार रुपये मानधन देखील मिळणार आहे. अनेक संस्थांसोबत करार करण्यात आला असून या संस्थांच्या माध्यमातून चांगल्या प्रतीचे संशोधन करून वैद्यकीय चिकित्सेत त्याचा उपयोग करता येऊ शकत असल्याची माहिती डॉ. मिलिंद निकुंभ यांनी कार्यक्रमात दिली.

Page 1 of 1

ताज्या बातम्या

Ahilyanagar : बनावट दूध प्रकरणात एका रात्रीत सात संशयित गजाआड

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar फक्राबाद (ता. जामखेड) येथे उघडकीस आलेल्या बनावट दूध निर्मिती प्रकरणाच्या तपासाला स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) नवे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी...