नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिकची ग्रामदैवता कालिका देवी मंदिरात (Kalika Devi Temple) सुरू असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवात सोनसाखळी चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मंदिरात दर्शनासाठी (Darshan) उसळणाऱ्या गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी अवघ्या सहा दिवसांत १६ महिला भाविकांच्या अंगावरील सोनसाखळ्या लांबवल्या आहेत. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून, या गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा नेमका बंदोबस्त आहे कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनांमुळे महिला भाविकांमध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण आहे.
कालिका देवी मंदिरात रविवार (दि. ११) पासून शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्र, ठाणे, पुणे आणि पालघर यांसारख्या विविध भागांतून दररोज हजारो भाविक (Devotee) देवीच्या दर्शनासह यात्राेत्सवात हजेरी लावत आहेत. मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड वर्दळ असते. नेमक्या याच गर्दीचा आणि गोंधळाचा फायदा घेत चोरट्यांनी महिला भाविकांना पद्धतशीरपणे लक्ष केल्याचे समोर आलेल्या तक्रारींवरून स्पष्ट होते. गेल्या रविवारपासून शुक्रवारपर्यंतच्या अवघ्या सहा दिवसांत १६ महिलांच्या सोनसाखळ्या चोरीला गेल्या आहेत.
मंदिर प्रशासनाकडून भाविकांना सुरक्षित आणि सुलभ दर्शन मिळावे यासाठी जय्यत तयारी केली जाते. मात्र, गर्दी नियंत्रण आणि गुन्हेगारांवर वचक ठेवण्याची मुख्य जबाबदारी असलेल्या मुंबईनाका पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नवरात्रोत्सवात मोठ्या संख्येने भाविक येणार, याची पूर्ण पूर्वकल्पना असतानाही प्रशासनाकडून प्रभावी बंदोबस्त, नियमित गस्त (पेट्रोलिंग) आणि साध्या वेशातील पोलिसांची (Police) टेहळणी करण्यात दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्रस्त भाविकांनी केला आहे. गर्दीच्या ठिकाणी नेमके किती पोलीस कर्मचारी तैनात आहेत? सीसीटीव्ही यंत्रणेचा कितपत प्रभावी वापर होतोय? याचीतपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
कडक कारवाईची मागणी
नवरात्रोत्सवाचे उर्वरित दिवस पाहता, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मंदिर प्रशासनासह पाेलिसांनी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. मंदिर परिसरात अतिरिक्त बंदोबस्त वाढवावा, सतत गस्त घालावी आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून संशयितांवर करडी नजर ठेवून सोनसाखळी चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पीडित महिला भाविकांसह नागरिकांनी केली आहे.




