Thursday, September 17, 2026
HomeनाशिकNashik News : जोपूळ आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्याचे आदेश

Nashik News : जोपूळ आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्याचे आदेश

किचनची दुरवस्था || विद्यार्थ्यांना जमिनीवर झोपावे लागत असल्याचे पाहून आदिवासी विकासमंत्री संतप्त

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आश्रमशाळांमधील असुविधांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी गुरुवारी (दि.१७) सायंकाळी दिंडोरी तालुक्यातील जोपूळ येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेला अचानक भेट दिली. शाळेतील किचनची झालेली दुरवस्था आणि विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी साधे कॉटही उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर मंत्री उईके संतप्त झाले. त्यांनी अधिकाऱ्यांना शाळेची मान्यता रद्द करण्याच्या तोंडी सूचना देत विद्यार्थ्यांना अन्य शाळेत समायोजित करण्याचे निर्देश दिले.

- Advertisement -

मंत्री उईके दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी बोपेगाव व माणी येथील आश्रमशाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी तडजोड करणाऱ्यांना माफ केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जोपूळ आश्रमशाळेची अचानक पाहणी केली. शाळेतील किचनची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे पाहून त्यांनी अधीक्षकांना जाब विचारला. शाळा सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी कॉट उपलब्ध नसल्याने त्यांना जमिनीवर झोपावे लागत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शाळेतील कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावले. विद्यार्थ्यांना अशा परिस्थितीत ठेवणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी शाळेची मान्यता रद्द करण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान, ऑगस्टमध्ये याच आश्रमशाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून शाळेचे मुख्याध्यापक व अधीक्षकांसह पाच जणांविरोधात यापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिवासी संघटनेच्या वतीने प्रभाकर फसाळे व विकी मुंजे यांनी या विद्यार्थ्याच्या मृतदेहाची हेळसांड झाल्याचा आरोप करत त्याबाबतची माहिती मंत्री उईके यांना दिली. यावेळी प्रभारी आदिवासी विकास आयुक्त गोपिचंद कदम, अपर आयुक्त दिनकर पावरा, प्रकल्प संचालक अर्पिता ठुबे आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata गुरुवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 265 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या (Pomegranate) 8247 कॅरेटची आवक...