नवी दिल्ली | वृत्तसंस्था, २२ नोव्हेंबर २०२६
नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह (बालेन शाह) दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. नेपाळच्या पंतप्रधानांचे विमान दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाल्यानंतर भारत सरकारच्या प्रतिनिधींकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. उद्या ते राजघाट येथे महात्मा गांधी यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन अभिवादन करतील.हैदराबाद हाऊस येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बालेन शाह यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहे.बालेन शाह भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन येथे भेट घेणार आहेत. या बैठकीत व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, वाहतूक, कनेक्टिव्हिटी आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. मार्च २०२६ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिला भारत दौरा, तसेच पंतप्रधान म्हणून पहिला द्विपक्षीय परदेश दौरा आहे. पंतप्रधान बालेन्द्र शाह २२ आणि २३ नोव्हेंबर रोजी भारत भेटीवर असणार आहेत.
भारत आणि नेपाळ यांच्यात ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक तसेच आर्थिक संबंध आहेत. दोन्ही देशांमधील सीमावर्ती भाग, व्यापार, रोजगार, पर्यटन, ऊर्जा आणि दळणवळण या क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे बालेन शाह यांच्या या दौऱ्याचा मुख्य उद्देश दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत करणे आणि विकासाशी संबंधित प्रलंबित मुद्द्यांवर पुढील दिशा ठरवणे हा आहे.
नेपाळमध्ये ऑगस्ट महिन्यात आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि पायाभूत सुविधांचे नुकसान झाले. रस्ते, पूल, वीज प्रकल्प, शेती आणि घरे यांना मोठा फटका बसला. या पार्श्वभूमीवर भारताकडून पुनर्बांधणीसाठी आर्थिक मदत, अनुदान आणि सवलतीच्या कर्जाच्या शक्यतांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
भारत हा नेपाळचा प्रमुख व्यापार भागीदार आहे. नेपाळच्या आयात-निर्यात व्यवहारांमध्ये भारताची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या दौऱ्यात व्यापार वाढवणे, गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे, सीमावर्ती व्यापार सुलभ करणे आणि उद्योगांसाठी नव्या संधी निर्माण करणे यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध अधिक मजबूत करण्यासाठी आर्थिक सहकार्याचा दीर्घकालीन आराखडा तयार करण्यावरही भर दिला जाणार आहे.
विमान वाहतूक आणि हवाई मार्गांचा महत्त्वाचा मुद्दा
नेपाळला आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीसाठी अतिरिक्त हवाई प्रवेश मार्गांची आवश्यकता आहे. विशेषतः भैरहवा आणि महेंद्रनगर मार्गे भारतीय हवाई क्षेत्राचा वापर करून विमान वाहतूक अधिक सुलभ करण्याबाबत नेपाळकडून प्रयत्न सुरू आहेत.
या दौऱ्यात हवाई कनेक्टिव्हिटीचा मुद्दा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. अतिरिक्त हवाई मार्ग उपलब्ध झाल्यास नेपाळमधील विमानतळांवरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे अधिक सुलभ होऊ शकतात आणि पर्यटन व आर्थिक विकासाला चालना मिळू शकते.
ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी
भारत आणि नेपाळ यांच्यात ऊर्जा क्षेत्रातील सहकार्याला मोठी संधी आहे. जलविद्युत प्रकल्प, वीज व्यापार, पायाभूत सुविधांची उभारणी, रेल्वे आणि रस्ते संपर्क यावर दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने चर्चा होणार आहे.
या दौऱ्यात काही पूर्ण झालेल्या प्रकल्पांचे उद्घाटन, नवीन प्रकल्पांचे भूमिपूजन आणि विविध सामंजस्य करारांची देवाणघेवाण होण्याची शक्यता आहे.बालेन शाह यांचा भारत दौरा सुमारे २५ तासांचा असून, या दौऱ्यात प्रामुख्याने नवी दिल्लीतील उच्चस्तरीय बैठकांवर भर देण्यात आला आहे.




