पुणे | प्रतिनिधी | Pune
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्रावरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषदेत पुस्तकाच्या प्रती फाडून केलेल्या निषेधावर भाजप नेते तथा राज्याचे मंत्री आशिष शेलार यांनी, “पुस्तक फाडणे आपल्याला मुळीच मान्य नसून आपण कधीही पुस्तक फाडलेले नाही किंवा पंतप्रधानांचा निर्णयही फाडलेला नाही”, असे स्पष्ट करत साहित्य संस्कृतीचा सन्मान राखण्याचे आवाहन केले.
या पुस्तकातून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा तीव्र अपमान झाल्याचा तसेच मराठी साहित्य व अस्मितेचा अवमान झाल्याचा दावा करत शिंदेंच्या शिवसेनेच्या सहा प्रवक्त्यांनी जाहीरपणे पुस्तकाची प्रत फाडली होती, तसेच सावरकरांचा अपमान करणाऱ्या पुस्तकाची प्रत कुणी हसतमुखाने कशी स्वीकारू शकते, असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला होता. या संपूर्ण घटनेवर भाष्य करताना रविवारी पुण्यात पत्रकारांशी बोलतानाबोलताना आशिष शेलार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि पुस्तक फाडणे आपल्याला मुळीच मान्य नसून आपण कधीही पुस्तक फाडलेले नाही किंवा पंतप्रधानांचा निर्णयही फाडलेला नाही, असे स्पष्ट केले.
एखाद्या पुस्तकातील मूळ गाभ्याशी किंवा विचारांशी आपण सहमत असो वा नसो, पण पुस्तक निर्मिती हे सुसंस्कृतपणाचे लक्षण असून समाजाने पुस्तकांवर प्रेम करणारा दृष्टिकोन ठेवला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले. पुस्तकात मांडलेल्या विषयांवर किंवा भूमिकेवर आंदोलन करण्याचा लोकशाही अधिकार असला तरी साहित्यनिर्मितीच्या संदर्भात सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे, असे सांगत त्यांनी पुस्तकातील विचार कोणासाठी प्रेरक तर कोणासाठी पीडादायक ठरू शकतात आणि त्यावर आक्षेप किंवा हरकतीही घेतल्या जाऊ शकतात, हे अधोरेखित केले. मात्र, पुस्तक आणि साहित्यनिर्मिती समाजाला प्रगल्भ बनवण्याचे आणि माणसाची जडणघडण करण्याचे महत्त्वाचे काम करत असल्याचे स्पष्ट करत पुस्तक फाडणे ही आपली संस्कृती नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.




