Friday, August 21, 2026
Homeराजकीयराहुल गांधींच्या पुणे दौऱ्यापूर्वी कन्हैया कुमारांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले, "शाळेत...

राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यापूर्वी कन्हैया कुमारांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले, “शाळेत गुरु नाहीत, मग देश…”

पुणे | Pune

देशातील शिक्षण व्यवस्था, वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटना आणि वाढती बेरोजगारी या मुद्द्यांवरून काँग्रेसने केंद्र सरकारविरोधातील आंदोलन अधिक तीव्र करण्याची तयारी सुरू केली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याच्या पूर्वसंध्येला काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. शिक्षण हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना राष्ट्रीय पातळीवर आवाज देण्यासाठी देशातील ८०० शहरांमध्ये ‘छात्रों की गुंज’ ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

- Advertisement -

कन्हैया कुमार यांनी पुण्याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शिक्षण चळवळीचा उल्लेख केला. मुलींच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी केलेला संघर्ष आजही प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांनी शिक्षण क्षेत्रात आजही अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप केला. शिक्षणाला प्रोत्साहन देण्याऐवजी व्यवस्थेवर दबाव आणला जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याचा उद्देश विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणे आणि शिक्षणाच्या हक्काचा संदेश देशभर पोहोचवणे हा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सावित्रीबाई फुले यांच्या कार्यभूमीतून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना राष्ट्रीय स्तरावर मांडण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्र सरकारवर निशाणा साधताना कन्हैया कुमार म्हणाले की, देशातील सामान्य विद्यार्थ्यांच्या समस्या सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. शिक्षण व्यवस्थेतील अडचणी, सरकारी शाळा आणि महाविद्यालयांतील परिस्थिती याकडे गांभीर्याने लक्ष देण्याऐवजी केवळ घोषणांवर भर दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

परीक्षा व्यवस्थेवर भाष्य करताना त्यांनी गेल्या दहा वर्षांत विविध स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियांमध्ये १५२ वेळा पेपरफुटीच्या घटना घडल्याचा दावा केला. महाराष्ट्रातही अशा घटना सातत्याने समोर येत असल्याचे सांगत त्यांनी लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जात असल्याची खंत व्यक्त केली. वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) च्या कामकाजावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. पेपरफुटीच्या घटनांनंतर दोषींवर कठोर कारवाई होत नसल्याचा आरोप करत परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षण क्षेत्रातील पायाभूत सुविधांबाबत बोलताना महाराष्ट्रात दररोज सुमारे २५ शाळा बंद होत असल्याचा दावा त्यांनी केला. अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांनाही टाळे लागल्याचे सांगत, शिक्षण संस्था बंद होत असताना विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसे मिळणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिक्षकांची कमतरता, घटती शैक्षणिक गुणवत्ता आणि बंद पडणाऱ्या संस्था यामुळे भविष्यातील पिढीसमोर मोठे आव्हान उभे राहत असल्याचे ते म्हणाले.

बेरोजगारीच्या मुद्द्यावरही त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. दरवर्षी लाखो विद्यार्थी पदवीधर होत असले तरी त्यांना अपेक्षित रोजगार उपलब्ध होत नसल्याचा दावा त्यांनी केला. शिक्षण पूर्ण करूनही नोकरीची हमी नसल्याने तरुणांमध्ये अस्वस्थता वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

कन्हैया कुमार यांनी शिक्षणातील वाढत्या असमानतेचाही मुद्दा उपस्थित केला. चांगले शिक्षण ही काही मोजक्या लोकांची मक्तेदारी नसून प्रत्येक नागरिकाचा अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गुणवत्तेपेक्षा सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या व्यक्तींना प्राधान्य दिले जात असल्याची भावना तरुणांमध्ये निर्माण होत असल्याचाही आरोप त्यांनी केला.

‘छात्रों की गुंज’ ही केवळ राजकीय मोहीम नसून विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठीची चळवळ असल्याचे सांगत त्यांनी शिक्षणाचा अधिकार, पारदर्शक परीक्षा व्यवस्था, रोजगाराच्या संधी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या प्रश्नांवर देशभरातील युवकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले. राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याला या मोहिमेचा महत्त्वाचा टप्पा मानले जात असून, शिक्षण आणि रोजगाराच्या मुद्द्यांवरून राष्ट्रीय स्तरावर नव्याने चर्चा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

आजच्या पिढीनं न बोलणंच उत्तम; काँग्रेसमधील सुसंवादावरून नाना पटोलेंनी सुप्रिया सुळेंना...

0
मुंबई | Mumbai २०१४ च्या राजकीय घडामोडींवरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या...