नाशिक | प्रतिनिधी | Nashik
अत्यंत संवेदनशील आणि हायप्रोफाइल कैद्यांचा भरणा असलेल्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाच्या (Nashik Road Central Jail) सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. कारागृहातील क्वॉरंटाईन वार्डमध्ये सराईत बंदीवान मोकळेपणाने वावरताना, कॅरम खेळण्याचा आनंद घेताना आणि त्यांचे मोबाईलवर (Mobile) चित्रीकरण होऊन ते सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या सर्व प्रकारामुळे कारागृह सुरक्षेचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट झाले असून, कारागृह महानिरीक्षक सुहास वारके यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेऊन प्रत्यक्ष झाडाझडती घेणे गरजेचे झाले आहे.
कारागृहाच्या तटबंदीत प्रवेश करताना साध्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरही निर्बंध असतात. असे असताना हाय-सिक्युरिटीचा दावा करणाऱ्या नाशिकरोड कारागृहात कैद्यांच्या हातात थेट मोबाईल पोहोचतोच कसा, हा सध्याचा महत्त्वाचा आणि अनुत्तरित प्रश्न आहे. जामिनावर बाहेर आलेल्या काही कैद्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृहातील वरिष्ठ अधिकारी आणि काही संशयित कैद्यांच्या परस्पर संगनमतानेच हे सर्व नियमबाह्य कृत्य सुरू असण्याची शक्यता आहे. येथे नियुक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांवर आणि सुरक्षेवर कोणतेही नियंत्रण उरलेले नाही. त्यामुळे नाशिककरांसह (Nashik) माजी कैद्यांनीही संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करून, सखोल चौकशीअंती निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दाेन दिवसांपूर्वीच कारागृहास भेट दिली हाेती.
इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला एक व्हिडिओ १७ ऑक्टोबर ते २३ डिसेंबर २०२५ या कालावधीतील असून, क्वॉरंटाईन वार्डमधील सनी अरुण पगारे आणि श्रीजय उर्फ गौरव खाडे या दोन न्यायप्रविष्ट बंदीवानांचा आहे. यातील श्रीजय खाडे ऑगस्ट २०२६ मध्ये जामिनावर बाहेर आहे. सुरक्षेतील हा अक्षम्य निष्काळजीपणा दडपण्यासाठी आणि स्वतःच्या प्रशासकीय अपयशावर पांघरूण घालण्यासाठी कारागृह प्रशासनाने घाईघाईने नाशिकरोड पोलीस ठाण्यात केवळ व्हिडिओ काढणाऱ्या अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. कारागृह अधीक्षक अरुणा मुगूटराव यांच्या सूचनेनुसार कर्मचारी अनिल कपिले यांनी तक्रार नोंदवली खरी, परंतु अंतर्गत तपासणीची जबाबदारी असणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर काय कारवाई झाली, यावर प्रशासनाने सोयीस्कर मौन बाळगले आहे.
कारागृह गंभीर गुन्ह्यांची प्रयोगशाळा
नाशिकरोड कारागृहाचा इतिहास पाहता येथे यापूर्वी गांजा सापडणे, कैद्यांचा छळ होणे आणि हत्येची सुपारी दिली जाण्याच्या घटना घडल्या आहेत. मॅफेड्रॉन (एमडी) तस्करीच्या टोळ्यांनी याच कारागृहातून एमडीचा फॉर्म्युला तयार केल्याचे यापूर्वी उघडकीस आले होते. शहरातील गुन्हेगारीच्या अनेक घटनांचे धागेदोरे थेट कारागृहातून चालवले जात आहेत. संशयित कैद्यांपर्यंत मोबाईल, बेड्या आणि दोरखंड सहज कसे पोहोचतात, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे महानिरीक्षक सुहास वारके या साखळीवर काय कठोर कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कारागृहातील यापूर्वीचे उद्योग
- कारागृहात गांजा सापडतो, सुपारी दिली जाते, कैद्यांचा छळ होतो, याला जबाबदार कोण?
- कारागृहात कैद्यांना मारहाण झाल्यावर प्रशासन गप्प का?
- पोलिसांत गुन्हे नोंद होऊनही प्रशासनाला माहिती कशी नाही?
- कैद्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणावर?
- कैद्यांकडे बेड्या, दोरखंड पोहोचतात कसे?
- डॉक्टर व अधीक्षक दुर्लक्ष का करतात?
- नाशिकरोड कारागृहात अत्यंत गंभीर गुन्ह्यांसह हायप्रोफाइल कैदी
- मॅफेड्रॉन (एमडी) तस्करीच्या टोळ्यांनी नाशिकरोड, पुणे, ठाणे कारागृहातून एमडीचा फॉर्म्युला शोधला
- नाशिक शहरातील गुन्हेगारीत कारागृहातूनही दुश्मनी




