पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटीत (Panchvati) सुरू असलेल्या ‘रामकाल पथ’ विकासकामादरम्यान पंचवटीतील दुतोंड्या मारुती मंदिराच्या मागील बाजूस आणि श्री पाताळेश्वर मंदिराच्या शेजारी महापालिकेतर्फे पायऱ्या तोडण्याचे काम सुरू असताना पुरातन मंदिरे आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, हरिहर भेट आणि सोमवारच्या शुभमुहूर्तावर नंदीसह प्राचीन शिवलिंग व मंदिराचे अवशेष समोर आल्याने भाविकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. याशिवाय आणखी दोन प्राचीन मंदिरेही समोर आल्याची माहिती पुढे आली आहे.
सिटी सर्व्हे कार्यालयातील (डेप्युटी लँड रेकॉर्ड – DLR) सन १९१७ च्या जुन्या नकाशानुसार या परिसरात एकूण ५ मंदिरांची नोंद असल्याचे स्पष्ट होत आहे. पाताळेश्वर मंदिराच्या पुढेही पुरातन मंदिरे असल्याचे या नकाशावरून दिसून येते. खोदकामात नंदी, महादेवाचे शिवलिंग आणि प्राचीन खांब स्पष्टपणे दिसून येत असून, या शोधामुळे या ठिकाणाला ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
प्रशासनाला पाचारण आणि जतनाची मागणी
मंदिराचे अवशेष समोर येताच गोदाप्रेमी देवांग जानी आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत काँक्रीटीकरणासाठी सुरू असलेले काम थांबवले.तसेच, महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. तत्कालीन नगराध्यक्षांच्या कार्यकाळात हे मंदिर उद्ध्वस्त झाले होते; मात्र आता सिंहस्थ कुंभमेळा (Simhastha Kumbhmela) आणि रामकाल पथाच्या निमित्ताने या मंदिराचे योग्य पद्धतीने जतन व संवर्धन (रिस्टोरेशन) करण्यात यावे, अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. “विकासाच्या नावाखाली प्राचीन मंदिरांवर बुलडोझर चालवला गेल्यास तो सहन केला जाणार नाही. आपल्या प्राचीन वारशाचे जतन होणे अत्यंत आवश्यक असून, प्रशासनाने संवर्धनाची भूमिका स्पष्ट करावी,” असे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
मॅन्युअल पद्धतीने काम करण्याची मागणी
या परिसरात आणखी प्राचीन मंदिरे असण्याची शक्यता असल्याने, पुढील काम करताना नदीपात्रात जेसीबी सारख्या मोठी यंत्रसामग्री न उतरवता, ब्रेकरच्या सहाय्याने अत्यंत काळजीपूर्वक आणि मानवी (मॅन्युअल) पद्धतीने काम करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागानेही (ASI) यासंदर्भात नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उच्च न्यायालयाचे आदेश आणि पुरातत्व विभागाचे नियम पाळून या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन केले जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




