Thursday, April 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपडसाद : पणती जपून ठेवा, अंधार फार झाला..

पडसाद : पणती जपून ठेवा, अंधार फार झाला..

नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक

संकटांचा एक पॅटर्न ठरलेला असतो. ही संकटे कधीच एकटी येत नाहीत. ती हातात हात घालून, एकामागून एक येतात, जणू काही आपली परीक्षा पाहण्यासाठीच ती येत असतात. नैसर्गिक संकटांबाबत तर त्याची तीव्रता भयावह असते. नुकत्याच झालेल्या, अद्याप चालू असलेल्या बेमोसमी पावसामुळे आलेले संकट असेच इतर अनेक संकटांच्या हातात हात घालून आले आहे.

- Advertisement -

आखाती युद्धामुळे जगभर अस्वस्थता पेरली गेली आहेच, इंधन टंचाईमुळे महागाईने आकांत मांडला आहे. कृषी पिकांच्या निर्यातीला खीळ बसली आहे. युरोप वा अमेरिकादी देशांमधून येऊ घातलेली शेतीसाठीच्या वस्तुंची आयात रखडली आहे. खतांवर त्याचा परिणाम होऊ शकणार असल्याने आताच खरिपाची चिंता दस्तुरखुद्द शासनालाच भेडसावू लागली आहे. हे सारे कमी होते म्हणून की काय गेल्या तीन-चार दिवसांपासून पर्जन्यराजानेही जणू उभा दावा मांडला. दररोज कुठे ना कुठे तो गडगडाटत येतो. काही ठिकाणी गाऱांचा वर्षाव करतो तर काही ठिकाणी असे काही वादळ आणतो की उभी पिकेही आडवी होतात. काढणीला आलेल्या गहू, कांदे, द्राक्ष अशा कितीतरी पिकांचे या धांगडधिंग्यामुळे अतोनात नुकसान होत आहे. गेली तीन-चार वर्षे जवळपास प्रत्येक महिन्यात पाऊस पडतोय. हातातोंडाशी आलेला घास असा निघून जात असल्याने उपाशी पोटांची संख्या तेवढी वाढत चालली आहे. या संकटात बळीराजाला हात देणे, मदत करणे आणि दिलासा देणे गरजेचे आहे.

नुकतीच राज्य सरकारने दोन लाखांपर्यंतची पीक कर्जे माफ केल्याची घोषणा केली. ती प्रक्रिया अद्याप सरकारी कागदपत्रातच अडकलेली असतांनाच आता हे नवे संकट आलेय. ज्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार म्हणून आनंद झाला असेल त्यांचा आनंद नव्या संकटामुळे घडीभरचा ठरला. राज्याच्या जवळपास सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात पावसाने धुमाकूळ घातलेला असल्याने हे नवे संकट गहिरे झाले आहे. अजूनही दोन-चार दिवस पावसाचेच असल्याचे हवामान खाते सांगत असल्याने हानीची तीव्रता ही वाढतीच राहणार आहे. साहजिकच नुकसानीच्या पंचनाम्याचीही बोंब असणार. गेल्या काही महिन्यातील नुकसानीचे पंचनामेही अद्याप पूर्ण झालेले नसतांनाच हे नवेच संकट पुढ्यात आल्याने कृषी खाते देखील त्याबाबत किती गंभीर राहून सक्रियता दाखवेल याबाबत शंकाच वाटते. गेल्या महिन्यात पीक विम्याची सरकार व कंपन्यांनी कशी वासलात लावली याची साद्यंत माहिती याच सदरात दिली होती. त्याचे पुढे काय झाले हे कोणीही पुढे येऊन सांगायला तयार नाही.

शेतकर्‍यांना पीकविम्याचे किती पैसे मिळाले, त्याचे नुकसान किती झाले याची पुरेशी माहिती न देताच, कर्जमाफीचे तेवढे ढोल बडविले जात आहेत. या असल्या भंपकपणामुळे शेती व शेतकर्‍यांच्या परिस्थितीचे वास्तवच कळत नाही. शेतकर्‍यांना नेहमीच रडायची सवय असते, असा एक आक्षेप शहरी शहाणे घेत असतात. अशा मंडळींना या असल्या नैसर्गिक संकटावेळी बखोटी धरुन पावसाने घातलेला हैदोस दाखवायला न्यायला हवे. जेणेकरुन शेती किती फायद्यातोट्याची आहे याची कल्पना अशा मंडळींना येऊ शकेल. साधारण हा महिना म्हणजे रब्बीची पिके हाती येण्याची वेळ असते. उन्हाचा चटका वाढतो तशी पिकेही काढणीला येतात. पिकांमधील दाणा भरलेला असतो, तो उन्हाच्या चटक्याने अधिक कठीण व पक्का बनतो. ही सारी निसर्गाची किमया असते. हे चक्र हजारो वर्षे चालू आहे. त्याचमुळे केवळ आपल्याकडेच नव्हे तर जगभर अनेक सण-उत्सव हे पिके निघाल्यानंतरच्या समृद्धीच्या काळातच होत असतात. ते एक आनंदपर्व असते. काळ्याशार मातीतून निघालेला पिवळाधम्मक व टणकदार दाणा पाहून शेतकरी कष्टाचे चीज झाले म्हणून समाधान पावतो. नेमक्या अशावेळीच जर निसर्गाने दगा दिला आणि सारे होत्याचे नव्हते झाले तर त्या शेतकर्‍याने काय करायचे हा प्रश्न पडतो.

लक्षात घ्या, तीन ते चार महिने काबाडकष्ट करुन तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत, खपत ते पीक शेतकरी वाढवित असतो. आणि नेमके पीक कापणीच्या किंवा काढलेले पीक खळ्यातच असतांना पावसाने धुमाकूळ घातला तर त्या शेतकर्‍याचा जीव काय म्हणत असेल. अशी प्रासंगिक दु:खं पाचवीलाच पूजलेला हा शेतकरी तरीही निसर्गनियमाला शरण जात ही संकटंही हळूहळू, एक-एक करून निघून जातील, अशा आशावादात जगत असतो. कितीही अंधार दाटला तरी अनेक लोक धीर सोडत नाहीत. प्रत्येक रात्र संपतेच, आणि नवी आशेची पहाट उगवतेच. संकटेही तशीच असतात— थोडा काळ आपल्याला त्रास देतात, पण शेवटी निघून जातात, ही जगण्याची रीत समजून तो संयम ठेवतो. त्यातील काही जण तशाही परिस्थितीत आत्मविश्वास कमी होऊ देत नाहीत. पण अलिकडे संकटांची मालिकाच मागे लागलेली असल्याने अशी मंडळीही खचून चालली आहेत. म्हणूनच किमान अशा नैसर्गिक संकटात शेतकर्‍याला नियमांचा बाऊ न करता प्राथमिक मदत तरी तात्काळ मिळत गेली तरी त्याचे जगण्याचे बळ कमी होणार नाही.

ताज्या बातम्या

Shrirampur : भंडारदराच्या पाणी चोरीवर उच्च न्यायालयाचा दणका

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur भंडारदरा धरणाच्या पाणी वाटपात होणारी प्रचंड चोरी आणि नादुरुस्त मोजमाप यंत्रणेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य शासनाला कठोर शब्दांत फटकारले आहे....