नंदन रहाणे
कुठेही बाहेरगावी जायचे असले तर आधी वाटखर्चाची तरतूद करावी लागते. प्रवास म्हटला की काही ना काही पैसा हाताशी असलाच पाहिजे. आता प्रवासाची अनेक वेगवान साधने उपलब्ध आहेत. ताशी 30 पासून 120 किलोमीटर पर्यंतच्या वेगाने स्वयंचलित वाहने धावतात. रस्तेही रुंद व सपाट आहेत. त्यामुळे प्रवास वेगाने पार पडतो. पूर्वी असे सुखकर मार्ग नव्हते. अरुंद, धुळ व दगडांनी भरलेल्या, खडड्यांनी व काटेरी निवडूंगानी व्यापलेल्या रस्त्यांनी प्रवास करणे म्हणजेच एक दिव्यच असे. अवघड घाट होते, चोरांचे भय होते. हिंस्त्रश्वापदांचे हल्लेही होत असत. तरी देखील माणसे तीर्थयात्रेच्या हेतूने बद्रीनाथ केदारनाथपासून रामेश्वर कन्याकुमारीपर्यंत हिंडतच होती. हिंगलाजमातेच्या बलुचिस्तानापासून कामाख्यादेवीच्या आसामपर्यंत सर्वत्र लोकांचे येणे-जाणे असे.
आता असा प्रवास पायी किंवा घोड्यावरुन अथवा बैलगाडीपासून करायचा झाल्यास 4 ते 6 महिनेसुध्दा लागत. एवढा काळ घराबाहेर काढायचा तर अन्नसामग्रीसाठी पैसा तर लागणारच ना? हल्लीही आषाढीच्या दिंड्या निघतात, तेव्हा गावोगावी स्वागत होते…भाविकजन न्याहारी व भोजनाची व्यवस्था आनंदाने करतात. पण, काही ना काही खर्च होतच असतो. त्यासाठी किमान काही रक्कम घेऊन, मगच वारंकरी घराबाहेर पडतात. प्राचीन काळी कागदी नोटा नव्हत्या. तेव्हा कवड्या, तांब्याची व चांदीची नाणी प्रचारात होती. ती देऊन घेऊन व्यवहार चालत असत. नामदेव महाराजांच्या घरी सर्व प्रकारची कामे करणारी आश्रित जनाबाई… तिचा नाण्यांशी म्हणजेच धनशी संबंध कितीसा येणार? पण तिने पैशावर एक फार छान रुपक केले आहे. विठ्ठलाच्या भक्तांकडे कोणता पैसा असतो? तर ती म्हणजे –
निराकारीचे नाणे ।
शुध्द ब्रह्यीचे ठेवणे ॥1॥
प्रयत्ने काढीले बाहेरी ।
साधुसंत सौदागरी ॥2॥
वसिष्ठ न्यास नारद मुनी ।
टाकसाळ घातली तयांनी ॥3॥
उद्धव अक्रुर स्वच्छंदी ।
त्यांनी आटविली चांदी ॥4॥
केशवनामयाचा शिक्का ।
हारप चाले तिन्हीं लोका ॥5॥
पारखी नामयाची जनी ।
वरी विठोबाची निशाणी ॥6॥
परब्रह्य हे निर्गुण निराकार आहे, तेथे विश्वद्रव्याची मौल्यवान राशी आहेत. त्यांना आकार नाही, वजन नाही, रुप नाही, रेखा नाही की रंगही नाही. चैतन्यमय असलेले ते शुद्ध द्रव्य अतिशय दुष्प्राप्य होय. मात्र, ऋषीमुनी साधुसंत यांनी प्रचंड परिश्रम केले आणि ते केवल धातु ब्रह्यलोकातुन बाहेर काढून, स्वत: सौदागर व्यापारी बनून अध्यात्मव्यवहारास प्रारंभ केला. त्रैलोक्य हिंडणारे नारदमुनी, वेदसंहितांचे अधिकारी वसिष्ठऋषी, महाभारतासारख्या महाकाव्याचे निर्माते व्यास यांनी तर टाकसाळच घातली. जिथे नाणी पाडण्याचे काम चालते तिला ‘टंकशाला’ असे म्हणतात. धातुच्या जाड पत्र्यांचे गोल तुकडे पाडून, त्यावर अक्षरे किंवा रेखाचित्रे म्हणजेच ‘टंक’ उमटविणे ही नाणेनिर्मितीची प्रक्रिया असते. त्यासाठी सर्वात आधी धातुच्या विटा आटवुन, त्याचा रस ओतवुन पत्रा ठोकावा लागतो. ते काम अक्रुर व उद्धवांसारख्या भक्तांनी स्वच्छंदपणे केले आहे. त्यामुळे अनेक आकारांची व नाना प्रकारांची नाणी निर्माण झाली व ती व्यवहारात आल्याने जीवन समृध्द झाले.
कलियुगात तसाच एक परमभक्त जन्माला आला. त्याचे नाव नामदेव. त्याने ‘केशव’ या नामाचा शिक्का उमटवून नाणी पाडली. ही नाणी इतकी उत्कृष्ट व प्रतिष्ठाप्राप्त ठरली की त्रैलोक्यात सर्वत्र ती दिली घेतली जाऊ लागली. त्या नामयाची ही दासीजनी आहे. जी नाण्यांची पारख करुन वरती विठोबाची निशाणी करते! हा अभंग जनाबाईने लिहिला, तेव्हा महाराष्ट्रावर यादवांची राजवट होती आणि त्यांची नाणी व्यवहारात चालत होती. आज 700 वर्षानंतर ती नाणी देण्याघेण्यासाठी मिळतही नाहीत व चालतही नाहीत. संताच्या अभंगाची नाणी मात्र रोज खणखणीतपणे वाजत आहेत.





