पुणे (प्रतिनिधी)
केतन अग्रवाल खून प्रकरणाच्या घटनेकडे केवळ गुन्हेगारी घटना म्हणून न पाहता सामाजिक दृष्टिकोनातूनही तिचा विचार करण्याची गरज आहे. अशा घटना समाजासाठी गंभीर इशारा आहेत. तरुणांमध्ये सूडबुद्धी आणि विकृत मानसिकता का निर्माण होत आहे, याचे समाज म्हणून आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पुणे येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
केतन अग्रवाल खून प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ही घटना अतिशय धक्कादायक आणि अनाकलनीय आहे. समाज म्हणून आपल्याला यावर गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. शिकल्या-सवरलेल्या मुला-मुलींमध्ये अशा प्रकारची सूडबुद्धी आणि दुर्बुद्धी का तयार होते, याचे कारण शोधावे लागेल. या घटनेकडे केवळ गुन्हेगारी घटना म्हणून पाहून चालणार नाही. तर, सामाजिक अँगलनेही या घटनेकडे पाहायला हवे. समाजामध्ये अशा प्रकारची मानसिकता निर्माण होऊ नये म्हणून समाज, कुटुंब आणि शिक्षण व्यवस्था या सर्वांनी मिळून मजबूत व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे.
तरुणांमध्ये वाढत असलेल्या आक्रमकतेबाबत चिंता व्यक्त करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, तरुण वयात सूडबुद्धी किंवा हिंसक विचार निर्माण होऊ नयेत, यासाठी समाजाने अधिक संवेदनशील होण्याची गरज आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी सामाजिक पातळीवर उपाययोजना कराव्या लागतील.
नसरापूर (ता. भोर) येथे बालिकेवरील अत्याचार आणि व हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, या घटनेतील नराधमाला मृत्युदंडाचीच शिक्षा द्यावी, अशी मागणी केलेली आहे. ती मागणी न्यायालय मान्य करेल, अशी अपेक्षा आहे. या घटनेचा तपास आणि न्यायालयाकडून विक्रमी वेळेत निकाल लागला आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना घडल्यास त्यामध्ये जलदगतीने न्याय मिळू शकतो, असे उदाहरण या माध्यमातून समाजासमोर राहणार आहे.




