
मुंबई । Mumbai
राज्यभरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या लोहगड (पुणे) येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले आहे. ‘प्रेम, लग्न आणि धोका’ अशा चक्रव्यूहात अडकलेल्या या गुन्ह्यामुळे पुरुषांवरील अत्याचाराची आणि हल्ल्यांची एक भयानक दुसरी बाजू समाजासमोर आली आहे.
आपल्या प्रियकरासोबत कट रचून, होणाऱ्या नवऱ्याला अत्यंत निर्दयीपणे संपवल्याच्या आरोपाखाली मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन सध्या पोलिसांच्या कोठडीत आहेत. पुणे पोलिसांकडून या प्रकरणाची कसून चौकशी सुरू असून दररोज थक्क करणारे खुलासे समोर येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी आता आपला मोर्चा आरोपी सिया गोयलच्या कुटुंबाकडे वळवला आहे. या संपूर्ण कटात कुटुंबातील कोणाचा सहभाग होता का, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी थेट सियाच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या प्रकरणात आगामी काळात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे, आपल्या तरुण मुलाला गमावलेल्या अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. केतन अग्रवाल यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी आज पुण्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आपल्या मुलाला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी आर्त हाक त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिली. यावर मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाचे सांत्वन करत, “दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, सरकार पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे,” असे आश्वासन दिले.
पीडित कुटुंबाची संवेदनशीलता आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हा खटला ‘फास्ट ट्रॅक कोर्टात’ (जलदगती न्यायालय) चालवण्याची आणि राज्याचे ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची ‘विशेष सरकारी वकील’ म्हणून नियुक्ती करण्याची मागणी विशाल अग्रवाल यांनी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी तातडीने मान्य करत विधी व न्याय विभागाच्या सचिवांना तसे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे, ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनीही या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहण्यास आपली संमती दर्शवली आहे.
या धक्कादायक घटनेमुळे सियाच्या वडिलांना मोठा मानसिक धक्का बसला असून ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. कालच त्यांची प्रकृती स्थिर झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागातून (ICU) जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले. माध्यमांशी बोलताना त्यांनी एक मोठा खुलासा केला. सियावर या लग्नासाठी घरून कोणताही दबाव नव्हता. केतनचे स्थळ आले तेव्हा ती खूप आनंदी होती आणि तिने स्वतःच्या मर्जीनेच केतनला पसंत केले होते, असे तिच्या वडिलांनी सांगितले. जर तिचे कोणावर प्रेम होते, तर तिने लग्नाला नकार का दिला नाही? आणि थेट हत्येचा कट का रचला? या प्रश्नांनी आता संपूर्ण तपास यंत्रणेला चक्रावून सोडले आहे.




