Monday, December 2, 2024
Homeनगरउंदीरगाव गट आणि निमगाव खैरी गणात राजकीय हालचालींना वेग

उंदीरगाव गट आणि निमगाव खैरी गणात राजकीय हालचालींना वेग

विधानसभेच्या निकालाने नेतेमंडळीत संभ्रामवस्था तर मतदारांमध्ये औत्सुकता

खैरी निमगाव | Khairi Nimgav

श्रीरामपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेचा उंदिरगाव गट हा सर्वात मोठा गट आहे. त्यामध्ये लहान-मोठी अशी एकोणाविस गावे आहेत. या गटात पंचायत समितीचे निमगाव खैरी व उंदीरगाव असे दोन गण येतात. निमगाव खैरी गण हा उंदिरगाव गटातील सर्वात मोठा गण असल्याने यावेळी गटाची व गणाची नव्याने तोडफोड होऊन सदस्यांची संख्या वाढणार आहे. आणि नवीन भौगोलिक रचनेनुसार गावे, लोकसंख्या यावर गट व गणाची रचना बदलणार असल्याने इच्छुक उमेदवारांसह तालुक्याच्या नेते मंडळीमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीवरून काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या या गटात व गणात उमेदवार आणि नेते मंडळींना वैयक्तीक संपर्क वाढवावा लागणार आहे.

- Advertisement -

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत उंदीरगाव गटात तिरंगी लढत झाली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी, मुरकुटे यांची लोकसेवा विकास आघाडी व कांबळे-पटारे गट अशा तिरंगी लढतीत मतदारांना संघर्ष पहावयाला मिळाला होता. यावेळी विधानसभा निवडणुकीत झालेल्या युती आणि आघाड्यावरून होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चौरंगी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. थोडक्यात सर्वच इच्छुक उमेदवारांना या ठिकाणी संधी मिळणार आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मंगल अशोक पवार यांनी विजय संपादन केला होता. त्यांनी आघाडीच्या परिगा संजय काळे व राष्ट्रवादीच्या प्रतिभा जितेंद्र गोलवड यांचा पराभव केला होता.

तसेच निमगाव खैरी गणातील काँग्रेसचे उमेदवार विजय शिंदे यांनी विजय मिळवला होता. त्यांनी आघाडीचे उमेदवार शंतनू फोपसे व अपक्ष उमेदवार शिवाजी शेजूळ, राष्ट्रवादीचे कैलास बोर्डे यांचा पराभव केला होता. त्यावेळी उंदीरगाव गण आघाडीनेच आपल्या ताब्यात ठेवला होता. या गणामध्ये आघाडीच्या वैशाली अशोक मोरे यांनी विजय संपादन केला. त्यांनी काँग्रेसच्या भिमाबाई रावण मोरे, राष्ट्रवादीच्या मदरसा खरात यांचा पराभव केला होता. ना. राधाकृष्ण विखेपाटील यांनी देखील या भागात लक्ष केंद्रीत केलेले असल्याने ते भाजपाची यंदा ताकत आजमवणार असल्याचे दिसत आहे. पंरतू ते स्वंतत्रपणे निवडणूक लढवणार कीएखाद्या गटाबरोबर जाणार किंवा एखाद्या गटाला ताकद देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

या निवडणुकीसाठी काँगे्रसचे ससाणे, मुरकुटे, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गटाची महाआघाडी तर भाजप, शिवसेना शिंदे गट,राष्ट्रवादी अजित पवार गट यांची विधानसभेप्रमाणे युती झाली तर या गटात मोठी ताकत निर्माण होईल. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अविनाश आदीक यांची विधानसभेप्रमाणे युती होवून निवडणूक लढण्याचे संकेत मिळत आहे. तर शिंदे गटाच्या शिवसेनेचे भाऊसाहेब कांबळे, प्रकाश चित्ते यांचा गटही उमेदवार देऊ शकतो. मात्र, अनेक ईच्छुकांत कोणाला संधी मिळणार? गटातील जास्त लोकसंख्येचे मतदार असलेल्या गावातून स्थानिक उमेदवार देणार? तसेच निमगाव खैरी, गोंडेगाव उंदीरगाव व इतर गावांमध्ये मतदार संख्या जास्त असल्यामुळे या गावांमधूनच प्रत्येक पक्ष उमेदवारीसाठी प्रयत्न करणार आहे. हा देखील विषय महत्वपूर्ण ठरणार आहे. या भागात विखेपाटील यांचा भाजप गट किती सक्रीय राहणार यावर देखील बरीच गणिते जुळणार अथवा ढसळणार आहेत.

या गटात काँग्रेसकडून बाबा दिघे यांनी मागील दोन पंचवार्षिकमध्ये बांधकाम समितीचे अध्यक्ष असताना मोठी विकास कामे केलेली होती. त्याचप्रमाणे या भागातील प्रत्येक गावात सर्वसामान्यांच्या कायम सुख-दुःखात राहून संपर्कात असल्याने दिघे यांनी जर या गटात निवडणूक लढविली तर त्यांना सोपी जाईल, असे अनेक जाणकारांचे मत आहे. मात्र, यांना कडवी झुंज देण्यासाठी तालुक्यातील बडे नेते पडद्याआडून अथवा समोरून एकत्र आल्यास त्यांना निवडणूक जड जाईल. निमगाव खैरी गणात मागील वेळी अपक्ष असूनही तीन नंबरची मते मिळवलेले शिवाजी शेजुळ यांनी यावेळी पक्षाकडून उमेदवारी केली तर होणारी लढत अधिक रंगतदार ठरणार आहे.

तर गोंडेगावचे युवा नेते शंतनू फोफसे यांना अपक्षामुळे पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे ते देखील सावध भूमिका घेत उमेदवारी करण्याची शक्यता आहे. या गटात तसेच दोनही गणात इच्छुकांची भाऊगर्दी असून इच्छुक उमेदवार आपआपल्या पक्षाकडे तसेच गटाकडे उमेदवारीसाठी जोर लावणार आहेत. उंदीरगाव गटात निमगाव खैरी व उंदीरगाव असे दोन गण येतात या दोन गणांना मिळून तोडफोडीने तीन गण केल्यास अनेकांना उमेदवारीची संधी मिळणार आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सध्या चार गट व पंचायत समिती मध्ये आठ गण आहे. परंतू या निवडणूकीमध्ये जिल्हा परिषद 5 ते 6 गट व पंचायत समितीचे 9 ते 10 गण होणार असल्याचे समजते, यामध्ये अनेक राजकीय मातब्बर नेत्यांच्या गटाची व गणाची तोडफोड होणार असल्यामुळे प्रत्येकाला नवीन उमेदवार शोधण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे गटात व गणात निवडणुकीचा कल बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या