अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेले खरीपाचे पिक गेले. यंदा तरी खरीप हाती लागणार का अशी भिती व्यक्त होत आहे. अलनिनोमुळे पावसाचे प्रमाण कमी, बियाणे व खत घेण्यासाठी बँका दारात उभे करीत नाही, मशागतीला टँक्टर महागला आहे, अशा परिस्थितीमध्ये कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन केले आहे.
यंदा खरीपाच्या विविध पिकांसाठी तब्बल 7 लाख 67 हजार 965 हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी लागणारे बियाणे 92 हजार 463 क्विंटल तर 2 लाख 23 हजार 100 मेट्रीक टन खत उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्यावर्षी सरासरीपेक्षाही पाऊस अधिक पडूनही खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. असे असतांनाही यंदाच्या खरीपाच्या क्षेत्रात गेल्यावर्षीच्या तुलनेत 35 हजार 204 हेक्टर क्षेत्र वाढविण्यात आले आहे. त्या प्रामुख्याने तूर, मूग, उडिद, कापूस, भात, मका या पिकांच्या क्षेत्रात वाढ केली आहे. पिकानिहाय क्षेत्र हेक्टरमध्ये आहे. भात 21 हजार, बाजरी 67 हजार, मका 1 लाख 17 हजार, तूर 77 हजार, मूग 52 हजार, उडिद 76 हजार, सुर्यफूल 27 हजार, सोयाबीन 1 लाख 9 हजार, कापूस 1 लाख 56 हजार याप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे.
खरीप हंगामासाठी 92 हजार 453 क्विंटल बियाणांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात सार्वजनिक बियाणे 27 हजार 535 व खासगी 64 हजार 928 क्विंटल बियाणांचे नियोजन केले आहे. तर महाबीजमार्फत 22 हजार 935 बियाणे उपलब्ध होणार आहेत. यात कापूस, उडीद, मूग, तूर, मका, बाजरी व भात या बियाणांचा समावेश आहे. त्याप्रमाणे खतांचे नियोजन करण्यात आले आहे. 3 लाख 8 हजार 681 मेट्रीक टन खतांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 2 लाख 23 हजार 100 मेट्रीक टन खतांचे आवंटन मंजूर झाले आहे. सध्या 31 मार्च 2026 अखेर शिल्लक साठा 1 लाख 45 हजार 35 मेट्रीक टन उपलब्ध असून 1 एप्रिल नंतर 2 हजार 600 मेट्रीक टन खत उपलब्ध झाले आहेत.
आखाती युद्धामुळे रसायनिक खतांचा तुटवटा भासणार नाही अशी ग्वाही कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. त्यात सध्या उपलब्ध असलेले खत मेट्रीक टनमध्ये युरिया 19 हजार 674, डिएपी 8 हजार 743, एमओपी 4 हजार 836, संयुक्त खते 88 हजार 691, एसएसपी 25 हजार 633. त्याबरोबर खतांचा संरक्षित साठा देखील करण्यात आला आहे. त्यात युरिया 7 हजार 900, डीएपी 850 मेट्रीक टन.
जिल्ह्यात शेतकर्यांना दर्जेदार निविष्ठा मिळावी म्हणून प्रत्येकी तालुक्यात भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांद्वारे निविष्ठा विक्रीकेंद्रांची तपासणी करून निविष्ठांचा दर्जा तपासण्यासाठी नमुने काढणे, कागदपत्रांची तपासणी करणे, जादा दाराने निविष्ठा विकल्या जाणार नाही यावर नियंत्रण ठेवण्यउाचे कामे या नियंत्रण निरीक्षकांकडून केले जाणार आहे. जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी आवश्यक ती निविष्ठा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकर्यांना कोणतीही अडचण आल्यास कृषी अधिकार्यांची संपर्क करावा.
– सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.




