नाशिक | प्रतिनिधी
नाशिक महापालिकेतील दहा स्वीकृत नगरसेवकांची नावे निश्चित झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांमधील इच्छुकांच्या नाराजीचे नवे आव्हान निर्माण झाले होते, स्वीकृत नगरसेवकपदासाठी शेकडो जण इच्छुक होते. मात्र, अंतिम निवडीत संधी न मिळाल्याने नाराज झालेल्या या इच्छुकांना आता स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधित्वाच्या माध्यमातून संधी मिळण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या सहा विभागीय कार्यालयांच्या स्तरावर प्रत्येकी तीन याप्रमाणे एकूण १८ प्रतिनिधींची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकपदाची संधी हुकलेल्या इच्छुकांचे लक्ष आता या नियुक्त्यांकडे लागले आहे. नाशिक महापालिकेत भाजपचे सहा, शिवसेना शिंदे गटाचे दोन, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसचा गटाचे दोन, अशा दहा स्वीकृत नगरसेवकांची निवड निश्चित झाली आहे. या निवडीनंतर विविध पक्षांतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संधी मिळू शकलेली नाही. त्यामळे पक्षांतर्गत नाराजी व्यक्त होत आहे. अशा इच्छुकांना विभागीय स्तरावर प्रतिनिधित्वाची संधी देण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींच्या नियुक्त्या महत्वाच्या ठरणार आहेत.
Nashik News: ‘स्वीकृतांच्या’ नावांवर शुक्रवारी होणार शिक्कामोर्तब
महापालिकेच्या सहा विभागीय कार्यालयांच्या स्तरावर प्रत्येकी तीन प्रतिनिधींची नियुक्ती करण्याची तरतूद आहे. या प्रतिनिधींचा कार्यकाळ एक वर्षाचा असणार आहे. त्यानुसार शहरात एकूण १८ जणांना संधी मिळणार आहे. या नियुक्त्यांसाठीची प्रक्रिया लवकरच महापालिकेच्या नगरसचिव विभागाकडून राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून, इच्छुकांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.
जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर इच्छुकांची नावे संबंधित विभागीय कार्यालयांच्या स्तरा वर दाखल होतील. त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून निवडीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. विभागीय अधिकारी आणि विभागीय सभेत ही निवड प्रक्रिया पार पडणार असून, इच्छुकांमधून बहुमताच्या आधारे प्रतिनिधींची निवड केली जाणार आहे. स्वीकृत नगरसेवकपदासाठी पक्षांतर्गत स्पर्धा तीव्र होती. अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या पदाची अपेक्षा होती. मात्र, मर्यादित जागांमुळे अनेकांना संधी मिळाली नाही. आता स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधित्वाच्या माध्यमातून त्यांना विभागीय स्तरावर काम करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.




