मुंबई | Mumbai
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सोमवारी पुण्यात दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण अमित शाह यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात शाहांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. त्यावर आता उध्दव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अमित शाह यांनी अजित पवार यांचं जगण मुश्किल केलं होतं असा गंभीर आरोप उध्दव ठाकरे यांनी केला आहे.
अजितदादा हयातीत असताना आरोप केले आणि काल त्यांनी नाक रगडलं
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, ‘अमित शाह किती दिवसांनी अवतीर्ण झाले? झेन-झीचे आंदोलन सुरू असताना कुठे होते? चकाट्या पिटणाऱ्या गृहमंत्र्यांनी हे बोलू नये. अजितदादा असताना त्यांच्यावर आरोप केले. त्याच अजितदादांच्या स्मारकचं लोकार्पण काल त्यांनी केले. अजितदादा हयातीत असताना आरोप केले आणि काल त्यांनी नाक रगडलं.'”अमित शाहांचं वाक्य हे काही ब्रह्मवाक्य नाही, तर ते थापाड्याचं वाक्य आहे. स्वतःचं कर्तृत्व सांगण्यासारखं काहीही नसल्यामुळे खोटं बोलून रेटून नेलं जात आहे.”
तेव्हा गृहमंत्री संसदेच्या बाथरूममध्ये जाऊन बसले होते
देशातील विविध प्रश्नांवरून गृहमंत्र्यांवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी विचारले की, “देशात Gen-Z आंदोलन सुरू असताना आणि त्यावर उत्तर द्या असं लोक म्हणत होते, तेव्हा गृहमंत्री संसदेच्या बाथरूममध्ये जाऊन बसले होते. शाह संसदेत येत होते पण सभागृहात येऊन उत्तर देत नव्हते, असेही उद्धव यांनी म्हटले. अमित शाह किती दिवसांनी अवतीर्ण झाले? मणिपूर किंवा अरुणाचल प्रदेशमध्ये ज्या घटना घडत आहेत, तिथे गृहमंत्र्यांनी जायला हवं होतं असेही उद्धव यांनी म्हटले.
भाजपशासित उत्तर प्रदेशात ७० बालकं ऑक्सिजनअभावी तडफडून मेली
कोरोना काळात अजितदादांचा आपल्याला फोन यायचा. मात्र, मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधता येत नसे असे टीकास्त्र शाह यांनी सोडले होते. त्यावर बोलताना उद्धव यांनी म्हटले की, “कोरोना काळात मुंबईतून जे लोक उत्तर प्रदेशात गेले होते, ते तिकडची अवस्था पाहून चिडले होते. त्यांच्या राज्यापेक्षा मुंबईत किती चांगली स्थिती होती याची त्यांना जाणीव झाली. कोविड नसतानाही भाजपशासित उत्तर प्रदेशात ७० बालकं ऑक्सिजनअभावी तडफडून मेली होती. कोरोना काळात उत्तर प्रदेशात गंगेत प्रेतं वाहत होती आणि गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या, तर महाराष्ट्रात काय स्थिती होती हे संपूर्ण देशाने पाहिलं आहे. कोरोना काळात देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून मी स्वतःला म्हटलं नव्हतं, तर तत्कालीन सर्वेक्षणाने सांगितलं होतं,” असंही ठाकरे यांनी म्हटले.
ते म्हणाले की, अजित पवार हे देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या दबावाखाली आणि मानसिक धक्क्यात होते. तसेच या लोकांनी अजित पवार यांची माफी मागायला हवी होती. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनीच अजित पवार यांना बदनाम करण्यासाठी मोठी मोहीम चालवली होती. भ्रष्टाचारी अजित पवार, ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा, अशा आरोपांचा सातत्याने प्रचार करण्यात आला. त्यांना वारंवार घाबरवून आणि दबाव टाकून शरद पवार यांचा पक्ष सोडण्यास भाग पाडण्यात आले.’



