अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पावसाअभावी खोळंबलेल्या खरीपाच्या पेरण्यांना आता वेग आला आहे. 1 जुलैला जिल्ह्यात अवघ्या 20 टक्के पेरण्या झाल्या होत्या. त्यात आता सहा दिवसातच 25 टक्के वाढ झाली असून खरीपाच्या विविध पिकांच्या पेरण्या 45.40 टक्के झाल्या आहेत. अर्थात काही तालुक्यात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे त्या तालुक्यात पेरण्या खोळंबल्या आहेत.
पंधरापासून दडी मारलेल्या मान्सूनने जिल्ह्यात हजेरी लावली आहे. त्यामुळे रखडलेल्या पेरण्यांना काहीसा वेग मिळाला. त्यानंतर पुन्हा चार दिवसांपासून घटमाथ्यासह जिल्ह्यात सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी आनंदी झाला असून खरीपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. सध्या जिल्ह्यात पावसाचा जोर सुरू असल्याने वापसा मिळाल्यानंतर पेरण्यांना वेग येईल. जून महिन्यात सरासरी 108.2 मिमी पावसाची नोंद होते. मात्र यंदा प्रत्यक्षात 43.6 मिमी पाऊस झाला आहे. तब्बल 65 मिमी पावसाची घट आहे. जुलै महिन्याच्या 7 तारखेपर्यंत जिल्ह्यात 50 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात खरीपासाठी सरासरी सहा लाख 74 हजार 461 हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी आतापर्यंत 3 लाख 6 हजार 182 हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या विविध पिकांची पेरणी झाली आहे.
सध्या तरी शेतकरी पेरणीयोग्य पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पिकनिहाय पेरणीची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. भात 17 हजार 275 हेक्टरपैकी 1 हजार 368 हेक्टर पेरणी झाली आहे. बाजरी 1 लाख 50 हजार 983 हेक्टरपैकी 18 हजार 306 हेक्टर पेरणी (12.1 टक्के), मका 60 हजार 798 हेक्टरपैकी 42 हजार 798 हेक्टर पेरणी (70.4 टक्के), तूर 36 हजार 104 हेक्टरपैकी 45 हजार 962 हेक्टर पेरणी (127 टक्के), मूग 47 हजार 36 हेक्टरपैकी 9 हजार 247 हेक्टर पेरणी (19 टक्के), उडीद 40 हजार 405 हेक्टरपैकी 21 हजार 220 हेक्टर पेरणी (52.5 टक्के), सोयबीन 87 हजार 330 हेक्टरपैकी 53 हजार 327 हेक्टर पेरणी (61 टक्के), कापुस 1 लाख 22 हजार 86 हेक्टरपैकी 99 हजार 477 हेक्टर पेरणी (81 टक्के) अशा पेरण्या झालेल्या आहेत.




