अकोले |प्रतिनिधी| Akole
शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कामगार, महिला आणि कष्टकरी जनतेच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेने सुरू केलेला अकोले ते मुंबई वाहन लाँग मार्च शहापूर येथे स्थगित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत विविध मागण्यांवर सकारात्मक आश्वासने मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत दुष्काळग्रस्त शेतकर्यांना मदत, नमो शेतकरी महासन्मान निधीचे थकीत हप्ते, नियमित कर्जफेड करणार्या शेतकर्यांचे प्रोत्साहन अनुदान, पीक विमा, वन व गायरान जमिनींचे हक्क, आदिवासींचे प्रश्न, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी, शालेय पोषण आहार कर्मचारी, बांधकाम कामगार आणि विविध शासकीय कर्मचार्यांच्या मागण्यांवर चर्चा झाली. अनेक मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय व आश्वासने देण्यात आली. मान्य मागण्यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी 4 नोव्हेंबर रोजी पुन्हा बैठक होणार आहे. आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून घेण्यासाठी तसेच प्रलंबित मागण्यांसाठी किसान सभा संघर्ष आणि पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अन्य मंत्री, संबंधित विभागांचे सचिव आणि किसान सभेचे शिष्टमंडळ उपस्थित होते. शिष्टमंडळात डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावित, आमदार विनोद निकोले, डॉ. अजित नवले यांच्यासह विविध पदाधिकारी सहभागी झाले होते.




