दिल्ली । Delhi
धार्मिक यात्रेचा आनंद क्षणात दुःखात बदलल्याची हृदयद्रावक घटना हरियाणातील कुंडली-मानेसर-पालवल (KMP) एक्सप्रेसवेवर घडली. राजस्थानमधील खाटू श्याम आणि सालासर बालाजी मंदिरांचे दर्शन घेऊन मथुरा-वृंदावनाकडे निघालेल्या भाविकांच्या पिकअप वाहनाचा मंगळवारी पहाटे भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला पिकअपने मागून जोरदार धडक दिल्याने ६ भाविकांचा जागीच मृत्यू, तर १४ हून अधिक जण गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात मंगळवारी पहाटे सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडला. ट्रकला बसलेली धडक इतकी तीव्र होती की पिकअप वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला. मृतांमध्ये तीन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश असून त्यांची नावे विजय सिंग, राजकुमार, रेश्मा देवी, कमला देवी, सुधा आणि महेश अशी आहेत. अपघातात जखमी झालेल्या सर्वांना तातडीने पलवल जिल्हा नागरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, रुग्णवाहिका आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वाहनात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य राबविण्यात आले. त्यानंतर जखमींना त्वरित रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातामुळे काही काळ एक्सप्रेसवेवरील वाहतुकीवरही परिणाम झाला. जखमींपैकी एका भाविकाने दिलेल्या माहितीनुसार, वाहन चालवित असताना चालकाला अचानक डुलकी लागल्यामुळे पिकअपवरील नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळले. या दाव्याची सत्यता तपासण्याचे काम पोलीस करत असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी सर्व बाबींची चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत आणि जखमी झालेले सर्व भाविक उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्याचे रहिवासी आहेत. ते काही दिवसांपूर्वी धार्मिक यात्रेसाठी रवाना झाले होते. सोमवारी त्यांनी राजस्थानमधील खाटू श्याम आणि सालासर बालाजी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मथुरा-वृंदावनाकडे प्रस्थान केले होते. मात्र, प्रवासादरम्यान झालेल्या या भीषण अपघाताने त्यांच्या यात्रेचे रूपांतर मोठ्या शोकांतिकेत झाले. पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला असून जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.




