
रांजणगाव देशमुख (वार्ताहर)
कोपरगाव तालुक्यातील बाहदराबाद येथे बुधवारी सकाळी घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. शेतातील पिकांवर फवारणी करण्यासाठी शेततळ्यातून पाणी घेण्यास गेलेल्या दोन तरुण शेतकऱ्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे बाहदराबाद गावावर शोककळा पसरली असून दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातील दोन कर्त्या, मेहनती आणि होतकरू शेतकऱ्यांचा अशा दुर्दैवी पद्धतीने मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेत दीपक रामचंद्र पाचोरे (वय ३३) आणि प्रशांत गीतराम पाचोरे (वय ३४) यांचा मृत्यू झाला. दोघेही शेती हा प्रमुख व्यवसाय करत असून आपल्या कुटुंबाचा आधार होते. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास दोघेही शेतातील पिकांवर औषध फवारणी करण्यासाठी शेततळ्यातून पाणी काढण्यास गेले होते. शेततळ्यावर गेल्यानंतर दीपक पाचोरे यांचा अचानक तोल गेला आणि ते पाण्यात पडले असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दीपक यांना वाचविण्याच्या प्रयत्नात प्रशांत पाचोरे यांनी कोणतीही पर्वा न करता शेततळ्यात उडी घेतली. मात्र शेततळ्यात दुर्दैवाने त्यांचा बुडून मृत्यू झाला.
दरम्यान, बराच वेळ उलटूनही दोघेही घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयां
ना चिंता वाटू लागली. प्रशांत पाचोरे यांच्या पत्नी यांनी त्यांचा शोध घेण्यासाठी शेताचा रस्ता धरला. शेततळ्याजवळ पोहोचल्यावर त्यांना फवारणीचा पंप आणि इतर साहित्य तळ्यावर पडलेले दिसले. ही बाब पाहताच त्यांच्या मनात भीती निर्माण झाली. त्यांनी तातडीने आरडाओरड करून गावकऱ्यांना बोलावले.
गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत शेततळ्यात शोध सुरू केला. काही वेळाने प्रशांत पाचोरे हे बेशुद्ध अवस्थेत पाण्यात आढळून आले. त्यांना बाहेर काढून तत्काळ उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र दीपक पाचोरे यांचा काहीच शोध लागत नव्हता.
यानंतर आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले. शेततळ्याची खोली आणि पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने शोधकार्याला अडचणी येत होत्या. अखेर शेततळ्याचे पाणी कमी करण्यासाठी तळ्याचा बांध फोडण्यात आला. शोधमोहीमेनंतर दीपक पाचोरे यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. दोघांनाही तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच बाहदराबादसह परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. कुटुंबीयांचा व नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. एका क्षणात दोन कुटुंबांचे आधारवड हिरावले.
मृत प्रशांत पाचोरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील असा परिवार आहे. तर दीपक पाचोरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा तसेच आई-वडील असा परिवार आहे. दोघेही आपल्या कुटुंबासाठी दिवसरात्र कष्ट करणारे, शांत आणि मनमिळावू स्वभावाचे शेतकरी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अकाली निधनामुळे नातेवाईकांसह मित्रपरिवार आणि ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेने शेततळ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शेतीसाठी पाण्याचा महत्त्वाचा स्रोत म्हणून शेततळ्यांची संख्या वाढत असली, तरी त्यांच्याभोवती आवश्यक सुरक्षाव्यवस्था नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अनेक शेततळ्यांना कठडे, संरक्षक जाळी, इशारा फलक किंवा बचावासाठी आवश्यक साधने उपलब्ध नसल्याने अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याचे दिसून येते.




