Friday, February 20, 2026
Homeनगरकोपरगावात बनावट रासायनिक खतांचा ट्रक जप्त

कोपरगावात बनावट रासायनिक खतांचा ट्रक जप्त

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Ranjangaon Deshmukh

बोगस खते घेऊन वैजापूरच्या दिशेने जात असलेल्या मालमोटारीवर कारवाई करून 6 लाख 24 हजार रुपये किंमतीचे 23.85 मेट्रिक टन संशयित रासायनिक खत जप्त करण्यात आले. ही कारवाई कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारातील कोपरगाव – वैजापूर रस्त्यावर मंगळवार रात्री नऊ वाजता करण्यात आली. या कोपरगाव पोलीस ठाण्यात मोटारीच्या चालकासह, पुणे, पंढरपूर व गुजरात येथील संबंधित चार खते कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी दिली.

- Advertisement -

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारातून बोगस खतांची मालमोटार वैजापूरच्या दिशेने जाणार असल्याची गुप्त माहिती मिळताच कोपरगाव कृषी विभाग व कोपरगाव शहर पोलीस यांचे संयुक्त पथक कारवाईसाठी संवत्सर शिवारात मंगळवारी रात्री 9 वाजता पोहोचले असता संशयित मालमोटार (क्र. एम एच 20 डी ई 0999) थांबवत पथकाने चालकाकडे चौकशी केली. मालमोटारीत रासायनिक खत असल्याचे त्याने सांगितले. मात्र खताच्या खरेदी-विक्री संदर्भातील कोणतीही कागदपत्रे त्याच्याकडे आढळली नाहीत. यानंतर संबंधित मालमोटार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील वखार महामंडळाच्या गोदामात आणण्यात आली. शासकीय पंचांच्या उपस्थितीत मालमोटारीचा पंचनामा करण्यात आला.

YouTube video player

एकूण 23.85 मेट्रिक टन संशयित रासायनिक खतांच्या तब्बल 4 हजार 77 बनावट खतांच्या गोण्या जप्त करण्यात आल्या असून त्याची अंदाजे किंमत 6 लाख 24 हजार रुपये इतकी आहे. ही कारवाई गणेश बिरदवडे (गुण नियंत्रक निरीक्षक कृषी विभाग, कोपरगाव), मनोज सोनवणे (तालुका कृषी अधिकारी, कोपरगाव), राहुल ढगे (जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक, अहिल्यानगर) तसेच पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने व दीपक रोठे यांच्या संयुक्त पथकाने केली. याबाबत कोपरगाव कृषी विभागाचे गुण नियंत्रक निरीक्षक गणेश बिरदवडे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. प्राथमिक तपासात खत (नियंत्रण) आदेश 1985 मधील विविध तरतुदी तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 मधील कलम 3 व 7 यांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले आहे.

विहित मानकांची पूर्तता नसलेल्या खताचे उत्पादन व विक्री, खताच्या गोण्यांवर खोट्या किंवा अस्तित्वात नसलेल्या उत्पादकांची नावे, खत नसलेल्या पदार्थांची खत म्हणून विक्री तसेच मागितलेली माहिती न देणे आदी गंभीर बाबी निदर्शनास आल्या आहेत. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 318 (4) अंतर्गत तसेच संबंधित कायद्यांनुसार मालमोटार चालकासह संबंधित 4 कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या फसव्या कंपन्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. मागील आठवड्यात अशाच पद्धतीने कोपरगाव कृषी विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली होती त्यानंतर मंगळवारी पुन्हा ही कारवाई करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे करीत आहे.

संशयावरून जप्त करण्यात आलेल्या तीन रासायनिक खतांच्या प्रकाराचे प्रत्येकी तीन नमुने घेऊन ते पंचांसमक्ष सीलबंद करण्यात आले असून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सर्व खताच्या गोण्या मोजणी करून गोदाम सीलबंद करण्यात आले. तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
– गणेश बिरदवडे

ताज्या बातम्या

Crime News : 18 लाखांचा 132 किलो गांजा जप्त; दोघे जेरबंद

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मिरजगाव परिसरात मोठी कारवाई करत 18 लाख 18 हजार रूपये किमतीचा 132.84 किलो गांजा, दोन...