कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargaon
पावसाने मारलेल्या दडीमुळे पिके जळून खाक झाल्याने संकटात सापडलेल्या बळीराजाला धीर देण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार आशुतोष काळे यांच्यासोबत कोपरगाव मतदारसंघातील चांदेकसारे येथे थेट शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. घाबरू नका, महायुती शासन व आम्ही सर्व तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहोत, अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी शेतकर्यांना दिलासा देत मदतीचे आश्वासन दिले.
कोपरगाव तालुक्यात पावसाभावी शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या भीषण परिस्थितीची दखल घेत आ. आशुतोष काळे यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून कोपरगाव मतदारसंघ दुष्काळग्रस्त जाहीर करून घेतला. या पार्श्वभूमीवर परिस्थितीची खरी दाहकता पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आमदार काळेंनी एक वेगळाच मार्ग अवलंबला.
पालकमंत्री विखे पाटील यांचा शिर्डी विश्रामगृह ते कोपरगाव असा नियोजित दौरा ठरलेला होता. मात्र, कागदी अहवालांपेक्षा शेतातील वास्तव परिस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास यावी यासाठी आ. काळेंनी थेट शिर्डी विश्रामगृह गाठले. अधिकार्यांसमवेत शेतकर्यांच्या बांधावर गेल्यास पंचनामे आणि पुढील कार्यवाही अधिक प्रभावी होईल, असा आग्रह त्यांनी पालकमंत्र्यांकडे धरला. आमदार काळेंची शेतकर्यांप्रती असलेली तळमळ पाहून पालकमंत्र्यांनी तात्काळ आपला दौरा बदलला. यानंतर आ. आशुतोष काळे यांनी स्वतः पालकमंत्र्यांच्या वाहनाचे सारथ्य करत त्यांना थेट चांदेकसारे येथील दुष्काळग्रस्त शेतांमध्ये नेले. करपलेली पिके आणि शेतकर्यांच्या अडचणी पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष जाणून घेतल्या.
यावेळी शेतकर्यांशी संवाद साधताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, या संकटाच्या काळात शेतकर्यांना आवश्यक ती सर्व मदत मिळवून देण्यासाठी शासन पूर्णपणे सकारात्मक आहे. शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी प्रत्येक अडचणीत तुमच्यासोबत ठाम उभा आहे. तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यानंतर आता प्रत्येक बाधित शेतकर्याला शासनाच्या मदतीचा लाभ मिळेपर्यंत माझा पाठपुरावा सुरूच राहील, असा विश्वास आ. आशुतोष काळे यांनी व्यक्त केला. या पाहणी दौर्याच्या वेळी प्रांताधिकारी धनंजय बांगर, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक शंकरराव चव्हाण, वसंतराव आभाळे, गंगाधर औताडे, रोहिदास होन, संजय शिंदे, देवेन रोहमारे, गजानन मते, गोपीनाथ रहाणे, ज्ञानेश्वर गव्हाणे, किरण होन यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, शेतकरी आणि महसूल व कृषी विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




