Wednesday, June 17, 2026
HomeनगरKopargaon : कोपरगाव बाजार समितीच्या काळे गटाच्या उपसभापतींसह सदस्यांचे सामूहिक राजीनामे

Kopargaon : कोपरगाव बाजार समितीच्या काळे गटाच्या उपसभापतींसह सदस्यांचे सामूहिक राजीनामे

सभापती अनागोंदी कारभार करीत असल्याचा आरोप

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargaon

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विद्यमान सभापतींकडून सुरू असलेला अनागोंदी कारभार, आर्थिक उधळपट्टी आणि शेतकरी हिताकडे होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ उपसभापतींसह काही सदस्यांनी सामूहिक राजीनामे दिले असल्याची माहिती विद्यमान उपसभापती गोवर्धन परजणे यांनी दिली.

- Advertisement -

गोवर्धन परजणे यांनी म्हटले आहे, बाजार समिती ही शेतकर्‍यांची कामधेनू आहे. आमचे नेते आ. आशुतोष काळे यांनी बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी हित जोपासले जावे या उद्देशातून आमच्यावर जबाबदारी दिली होती. त्यामुळे शेतकर्‍यांची कामधेनू असलेल्या संस्थेचे हित जपणे हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. मात्र काही महिन्यांपासून बाजार समितीमध्ये उत्पन्नाचा विचार न करता मोठ्या प्रमाणावर अनावश्यक खर्च करण्यात येत असून आर्थिक शिस्त पूर्णपणे ढासळत चालली आहे. सभापतींच्या सुरु असलेल्या सध्याच्या अनागोंदी कारभारामुळे संस्था आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर पोहोचण्याची भीती निर्माण झाली आहे. या पापाचे भागीदार होण्याची आमची अजिबात इच्छा नाही. आम्हाला पदापेक्षा शेतकर्‍यांचे हित आणि संस्थेची प्रतिष्ठा महत्वाची आहे.

शेतकर्‍यांच्या मालाला वाजवी दर देणारी हक्काची बाजारपेठ म्हणून बाजार समितीकडे पाहिले जाते. त्यामुळे शेतकर्‍यांसाठी अधिकच्या चांगल्या उपाययोजना कशा पद्धतीने राबविल्या पाहिजे याचा प्रामुख्याने विचार होणे गरजेचे असतांना शेतकर्‍यांच्या हितासाठी आवश्यक असलेल्या योजनांवर खर्च करण्याऐवजी गरज नसलेल्या बाबींवर नको त्या ठिकाणी निधी खर्च केला जात आहे. त्यामुळे संस्थेच्या आर्थिक शिस्तीला बाधा पोहोचत असून संस्थेची आर्थिक घडी विस्कटण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकर्‍यांच्या आणि बाजार समितीच्या भवितव्याशी खेळण्याचा हा प्रकार असून यामध्ये सुधारणा होईल अशी आम्हाला अपेक्षा होती. मात्र हा प्रकार थांबण्याऐवजी यामध्ये वाढ होत चालली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आणि बाजार समितीच्या भवितव्याशी खेळणार्‍या या कारभाराला आम्ही समर्थन देऊ शकत नाही.

संस्थेची अधोगती होत असतांना पदावर राहून मुकाट्याने पाहत बसणे हे शेतकरी बांधवांशी बेईमानी ठरेल. त्यामुळे आम्ही स्वखुशीने राजीनामा देण्याचा कठोर निर्णय फक्त आणि फक्त शेतकरी आणि संस्थेच्या हितासाठी घेतला आहे, असे उपसभापती गोवर्धन परजणे यांनी स्पष्ट केले आहे. सभापती यांच्या कारभाराविरोधात विद्यमान उपसभापतींसह सदस्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे बाजार समितीत मोठी खळबळ उडाली असून शेतकरी व व्यापारी वर्गातही या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा मृत्यू

0
पंचवटी | प्रतिनिधी Panchavati पंचवटी परिसरातील स्वामीनारायण पोलीस चौकीसमोरील महामार्गावर भरधाव लक्झरी बसने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी...