Thursday, November 26, 2026
Homeनगरराज्य नाट्य स्पर्धा : शवागरातील वास्तवाशी गुंफण घालणारी एका महिलेची व्यथा 'अंत्यकथा'

राज्य नाट्य स्पर्धा : शवागरातील वास्तवाशी गुंफण घालणारी एका महिलेची व्यथा ‘अंत्यकथा’

– संदीप जाधव

स्वार्थाने बरबटलेल्या जगात अनेक व्यक्तींकडून कमालीची पीडा सहन करावी लागते. समाजातील कुप्रवृत्तींमुळे जीवनात येणारी दुःखे, वेदना कमालीची अस्वस्थ करतात. मात्र अशा जिवंत माणसांत राहण्यापेक्षा मरण पावलेल्या व्यक्तींच्या सान्निध्यात राहिल्यास ते किमान यातना तरी देत नाहीत, अशी मानसिकता झालेल्या एका महिलेच्या जीवन प्रवासातील व्यथा सांगणारे ‘अंत्यकथा’ नाट्य राज्य स्पर्धेत बुधवारी (25 नोव्हेंबर) सादर झाले.

- Advertisement -

प्रा. प्रमोद खाडिलकरलिखित अंत्यकथा या नाटकाचे सादरीकरण नाट्य आराधना या अहिल्यानगरच्या संस्थेने केले. तेजस अतितकर यांनी त्याचे दिग्दर्शन केले. पहिल्या काही प्रसंगांतील वेगवान घडामोडींमुळे नाटकाने उत्सुकता वाढवली, पण नंतरच्या काही प्रसंगांवरून काहीसा संभ्रम नाटकाने निर्माण केला. काही तांत्रिक चुकाही झाल्या. मात्र, काही पात्रांच्या अभिनयामुळे नाटकात कमालीची गंभीरता आली. त्याला चांगल्या टाळ्याही मिळाल्या. नाटकाच्या कथेचा प्रारंभ खेडेगावातील एका मंदिरापासून होतो. मंदिरात भजन सादर करणार्‍या प्रामाणिक तात्यावर पैशांचा अपहार केल्याचा ठपका सावकार ठेवतो, तसेच कर्जाच्या वसुलीचा तगादाही लावतो. अपहाराच्या खोट्या आरोपामुळे अस्वस्थ झालेला तात्या गळफास घेऊन आत्महत्या करतो.

चंद्रा ही त्याची मुलगी. पुढ तरुणवयात तिचे लग्न शरदशी होते. काही दिवसांनी कर्जापोटी जमीन गिळंकृत करण्याचा डाव असणार्‍यांकडून शरदची हत्या होते. मग जमिनीसाठी चंद्राचाही छळ होतो, पण ती आपल्या लहान मुलीला घेऊन गावातून पळून जाते. पुढे ती दुर्गाक्का नावाने ओळखली जाते. अशीच भटकत असताना एका स्मशानभूमीत तिची भेट आबा या व्यक्तीशी होते. तो रुग्णालयातील शवागाराचा द्वारपाल असल्याचे सांगतो. भेदरलेल्या दुर्गाक्काला आबा धीर देतो. शवागारात रोजंदारीची नोकरी देतो. शवागारात रोजच वेगवेगळ्या प्रकारे मृत्यू झालेले शव विच्छेदनासाठी येतात. त्यांच्या मृत्यूचे कारण कसे ओळखायचे याची कल्पना आबा देतो. या मृतदेहांच्या मृत्यूच्या कारणांची मिमांसा करून आपल्या जीवनात घडलेल्या घटनांचा संदर्भ लावण्याचा प्रयत्न करते. दरम्यानच्या काळात पर्यावरणाशी निगडित चर्चाही त्यांच्यात होते.

एकदा शवविच्छेदनाचा खोटा अहवाल देण्यासाठी विलास हा रुग्णालय कर्मचारी आबावर दबाव आणतो, पैसेही देऊ करतो. मात्र, आबा पैसे न स्वीकारता प्रामाणिकपणे काम करतो. नंतर त्याची बदली होते. तेथे विलासची नेमणूक होते. दारूच्या नशेत तो दुर्गाशी लगट करून अनैतिक मागणी करतो. मात्र, परिस्थितीने स्वभावात कठोरता आणलेली दुर्गा त्याच्या गळ्याला सुरा लावून अद्दल घडविते. इथे पहिला अंक संपतो. नंतर शवविच्छेदनासाठी येणार्‍या प्रत्येक मृतदेहाशी दुर्गाक्का जणू संवाद साधण्याचा प्रयत्न करते. त्या वेळी तिला आपल्या जीवनातील वाईट घटना आठवतात. वडिलांची आत्महत्या, पतीची हत्या आणि जमिनीसाठी मागे लागलेल्या लोकांचे भय तिला कमालीचे अस्वस्थ करतात. त्यातून उद्विग्न होऊन मृतदेहाच्या मृत्यूच्या संभाव्य कथेशी आपली व्यथा जोडते. तिला भेटायला आलेली स्वतःची मुलगी सखू तिला अंतर देण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे ती आणखीनच भावनाविवश होते. स्वार्थी जिवंत लोकांत न राहता शवागारातील मृतांच्या सान्निध्यात राहणे ती पसंत करते. कारण मृतदेह निरासग असतात, ती खोटी बोलत नाहीत या तिच्या वाक्यातून सामाजिक विकृतीवर बोट ठेवले जाते.

शवागारातील त्या मृतदेहांच्या कथा स्वार्थ, एकाकीपणा, अनिष्ठ प्रवृत्ती आदी मुद्द्यांना स्पर्श करतात. पुढे एकदा आबाचाच मृतदेह शवविच्छेदनासाठी येतो आणि दुर्गा कमालीची दुःखी होते. आबाचे बोल तिला आठवतात. आपल्या बालपणापासून आतापर्यंत जीवनात आलेल्या व्यक्ती तिच्या डोळ्यासमोर येतात. आणि एका भावून प्रसंगाने नाटकाची सांगता होते. एका महिलेची करूण कहाणी दाखवणारे हे नाटक दिग्दर्शक तेजस अतितकर यांनी रंगमंचावर उतरवले. प्रसंगांनी चांगली वातावरण निर्मिती केली. नेपथ्य ही नाटकाची उजवी बाजू. मात्र नाटकात अनेक त्रुटी जाणवल्या. चंद्रा सोबत बाळ घेऊन जाते, तेव्हा ध्वनी किंवा संवादातून त्याचा उल्लेख करता आला असता. द्वारपाल असणारा आबा डॉक्टर नसताना शवविच्छेदन कसा करतो, हे समजले नाही. एका प्रसंगांत डॉक्टर शवागारातील मृतदेहाला घाबरते, हे वास्तवाला धरून वाटत नाही. अनेक प्रसंग प्रभावी करण्यासाठी वापरलेले संगीत अगदीच कर्णकर्कश्य वाटले. शवविच्छेदनानंतरही एका शवाच्या पायात बूट तसेच होते. नाटकात नेमके काय सांगायचे, याबाबत आणखी स्पष्टता असायला हवी होती. काही पात्रांनी मात्र नाटकात ‘जान’ आणली. अनेक विकृतींवर नाटकाने अचूकपणे बोट ठेवले. चंद्राचे लग्न झाल्यानंतर सायकलवरचा प्रसंग उत्तमपणे साकारला. निसर्गवादी भूमिकेचा नाटकात आलेला उल्लेख टाळ्या घेऊन गेला.

लहान चंद्राची भूमिका भार्गवी सुलक्षणे हिने चुणचुणीतपणे मांडली. तिचे स्पष्ट संवाद प्रभावी वाटले. मोठी चंद्रा आर्या सातपुते हिने रंगमंचावर आणली. दुर्गाक्काला तेजा पाठक यांनी साकारले. चेहर्‍यावरील हावभावांना डोळ्यातील करुणतेची योग्य साथ मिळाल्याने त्यांची भूमिका प्रभावी व लक्षवेधी ठरली. स्पॉट चांगले असूनही दोन प्रसंगांत त्या अंधारातच होत्या. तात्याची छोटी भूमिका तेजस अतितकर यांनी सहजपणे पूर्ण केली. ती अगदीच नैसर्गिक वाटली. निगरगट्ट कर्मचारी असणारे विलास हे पात्र विशाल कुटे यांनी प्रभावीपणे उभे केले. भाषेतील राकटपणा, समर्पक हावभाव व संवादातील चढउतार त्यांना उत्तम जमले. मात्र, शवागारातील एका प्रसंगांत अतिउत्साहामुळे त्यांंच्याकडून बाटलीतील दारू खाली सांडली! सावकार सुजीत भावे यांनी योग्यप्रकारे पार रंगवला. चेतनची भूमिका ऋषिकेश त्र्यंबके यांनी बिनधास्त पार पाडली.

याबरोबरच नाटकात गौरी देशपांडे (सखु व नर्स), मोनिका दारव्हेकर (डॉक्टर), अजिंक्य सोनवणे (सोन्यामामा), देवदत्त चौसाळकर (नारायण कुलकर्णी), देवांग कुलकर्णी (शरद), रघुनाथ सातपुते, राहुल रसाळ, महादेव गाडे, विलास अडगटला, प्राची जांभळे, हार्दिक चोरडिया, निषाद पानसरे, ओजस्वी पाठक, किमया कुटे यांनीही नाटकात आपापली भूमिका पार पाडली. याशिवाय शामिका जोशी, शुभ्रा अडगटला, आयुषी कुटे, आकाक्षा जवक, गौतम त्र्यंबके, भार्गव सुलक्षणे, रूद्र रसाळ, राहुल उजागले व अहना गंगापूरकर यांचाही नाटकात सहभाग होता.

नेपथ्य चैतन्य खानवेलकर, सुजीत भावे यांचे होते. मंदिर, स्मशान व शवागार अगदी प्रभावी वाटले. नेपथ्य नाटकाची सर्वांत जमेची बाजू वाटली. प्रकाश योजना सोहम दायमा यांची होती. स्मशानात व शवागारातील प्रसंग लाईट्समुळे प्रभावी झाले. दुसर्‍या अंकात मात्र जराशी गडबड झाली. शवागराबाहेरील लाईट विनाकारण चालू होती, दोन वेळेस स्पॉटही चुकले. मात्र लाईट गेल्यावर खिडकीतून आलेला प्रकाश उत्तम होता. पार्श्वसंगीत समीर पाठक, तनिष्क भंडारी यांनी दिले. प्रसंगांत भावूकता आणणारे संगीत योग्य वाटले. दुर्गाक्काच्या स्वगतावेळी समर्पक संगीत देता आले असते. तीन प्रसंगांत कर्णकर्कश्य संगीत कानाला खटकले. रंगभूषा चंद्रकांत सैंदाणे यांनी उत्तमपणे साकारली. दुर्गाक्का, आबा, विलास यांचे पात्र चांगले वाटले. वेशभूषा दीपाली अडगटला यांची होती. दुर्गाक्का, आबासह इतर पात्रांचीही वेशभूषा योग्य वाटली. विलासच्या डोक्यावर पांढरी टोपी दाखवता आली असती. पहिल्या काही वेगवान प्रसंगांत रंगमंच चपळाईने हाताळणारे विराज अडगटला, राहुल रसाळ, महादेव गाडे, मैथिली जोशी, तन्मयी भावे यांनी चांगले परिश्रम घेतले.

नाटकाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न तेजस अतितकर यांनी केला. कलाकारांचीही चांगली साथ मिळाली. नेपथ्यही उत्तम होते. सादरीकरणही चांगले. मात्र काही त्रुटी टाळल्या असत्या तर नाटक आणखी प्रभावीपणे प्रेक्षकांच्या मनात उतरले असते. कलाकारांचा मोठा जवाजमा हाताळताना दिग्दर्शक अतितकर यांनी मोठे परिश्रम घेतल्याचे दिसले.

ताज्या बातम्या

Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाची जोड देत शेतीपुरक व्यवसायाला प्राधान्य द्यावे...

0
नाशिक | Nashik नाशिक जिल्हा (Nashik District) कृषी क्षेत्रात प्रगत असून शेतीला आधुनिक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत उत्पादनक्षम व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची गरज आहे....