कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargaon
कोपरगाव (Kopargaon) तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याची (Leopard) दहशत शिगेला पोहोचली आहे. येसगाव परिसरातील बिबट्याच्या हल्ल्याची (Leopard Attack) घटना ताजी असतानाच तालुक्यातील नागरिकांमध्ये आता बिबट्याच्या सततच्या दर्शनामुळे आणि हल्ल्यांमुळे मोठे भय निर्माण झाले आहे. वन विभागाने (Forest Department) या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी तीव्र मागणी जनतेतून होत आहे.
14 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता कुंभारी-मायगाव देशमुख शिवारात ही ताजी घटना घडली. काळे वस्तीजवळ, दामू नामदेव मोरे (वय 49) यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला (Leopard Attack) केला. या हल्ल्यात दामू नामदेव मोरे हे जखमी झाले आहेत. घटनेनंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
उपचार घेताना प्रसारमाध्यमांशी बोलताना जखमी दामू नामदेव मोरे यांनी आपली भीती व्यक्त केली. ते म्हणाले, बिबट्याची दहशत (Leopard Terror) खूप वाढली आहे. वन विभागाने याकडे तात्काळ लक्ष घालून या बिबट्याचा बंदोबस्त करावा. दरम्यान, या परिसरातील नागरिकांनी वन विभागाला स्पष्ट इशारा दिला आहे की, जर बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्यात आला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.





