लासलगाव | वार्ताहर Lasalgaon
सततच्या अस्मानी संकटांमुळे ‘द्राक्षाची पंढरी’ म्हणून ओळख असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे अडचणी दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. गेल्या काही वर्षांपासून अवकाळी पाऊस, गारपीट आणि अनियमित हवामानामुळे द्राक्षबागा उद्ध्वस्त होत असून, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. याच संकटाने कंटाळून आज लासलगाव जवळील कोटमगाव येथील शेतकरी अजित गांगुर्डे यांनी स्वतःच्या द्राक्षबागेवरच कुऱ्हाड चालवत ती भुईसपाट करण्याचा निर्णय घेतला आहे.
मंगला संजय गांगुर्डे यांनी गट क्रमांक 236 मध्ये दोन एकर क्षेत्रावर लाखो रुपये खर्च करत द्राक्षबाग लावली. गेल्या तीन, चार वर्षांपासून सलग गारपीट, अवकाळी पावसाचे तडाखे आणि आता यंदा दिवाळीनंतरही सुरू असलेल्या पावसामुळे सर्व स्वप्न उद्ध्वस्त झाले. 26 एप्रिल पासून सुरू झालेला पाऊस अद्याप सुरु असल्याने ढगाळ वातावरण कायम आहे, परिणामी द्राक्षबागांना आवश्यक ते ऊन मिळाले नाही. यामुळे फळधारणा पूर्णपणे कोलमडली असून झाडांची वाढ खुंटली आहे.
गांगुर्डे कुटुंबाने ९ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते, मात्र सततच्या नुकसानीमुळे ते आता १८ लाख रुपयांपर्यंत वाढले. द्राक्ष निर्यात, उत्पादन आणि बाजारभाव या तिन्ही पातळ्यांवर मार बसल्याने कर्जाचा बोजा वाढत चालला.अशा परिस्थितीत तलाठी आणि कृषी अधिकाऱ्यांना पंचनाम्यासाठी सांगूनही ते प्रत्यक्ष पाहणीसाठी आले नाहीत, ही शेतकऱ्यांसाठी दुर्दैवी बाब ठरली आहे.या सर्व आर्थिक आणि मानसिक दडपणामुळे मंगला संजय गांगुर्डे यांचा मुलगा अजित गांगुर्डे या तरुण शेतकऱ्याने स्वतःच्या हाताने द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालवत ती सपाट केली आहे. मजुरी देण्यासाठी पैसाही उरलेला नसल्याने त्यांनी आप्तेष्ट आणि भाऊबंधांच्या मदतीने बाग उखडण्याचे काम हाती घेतले.
गांगुर्डे कुटुंबाने आता द्राक्ष शेतीऐवजी लहान-मोठे पिक घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, द्राक्ष शेतीतील मोठा गुंतवणूक खर्च, कर्जबाजारीपणा आणि प्रशासनाकडून मिळणाऱ्या मदतीचा अभाव यामुळे संताप आणि नैराश्य वाढ झाल्याचे चित्र या निमित्ताने दिसून आले
सततच्या अवकाळी पावसाने आम्हाला उद्ध्वस्त केलं, कर्ज फेडायचं कसं, घर चालवायचं कसं? प्रशासन पंचनामा करायला तयार नाही, मग आम्ही काय करायचं?
मंगला गांगुर्डे, द्राक्ष उत्पादक शेतकरी कोटमगाव
हवामानातील अनियमितता आणि सततचे आर्द्र वातावरण द्राक्ष फळधारणेसाठी घातक ठरत आहे. यामुळे येणाऱ्या काळात द्राक्ष उत्पादनात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. शासनाने तातडीने द्राक्ष उत्पादकांसाठी विशेष मदत जाहीर करणे गरजेचे आहे
रामनाथ शिंदे ,संचालक – द्राक्ष बागायतदार उत्पादक संघ नाशिक जिल्हा





