नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महाराष्ट्रातील (Maharashtra) साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगगडावरील मंदिराच्या (Saptshrungi Gad) नक्षीकामातील सुमारे २२ किलो चांदीची तफावत समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
मंदिरातील (Temple) नक्षीकामासाठी वापरण्यात आलेल्या चांदीच्या जुन्या नोंदीनुसार सुमारे ४०६ किलो चांदी असणे आवश्यक होते. मात्र, प्रत्यक्ष मोजणीत केवळ ३८३ किलो ७०३ ग्रॅम चांदी आढळली. यात सुमारे २२ किलो ४९० ग्रॅम चांदी गायब असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी ट्रस्टच्या कारभारावर संशय व्यक्त केला जात असून, मोठ्या अपहाराची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अपर आयुक्त (महसूल) जितेंद्र वाघ यांनी हे प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) आणि विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे वर्ग केले असून नियमानुसार कारवाईचे आदेश दिले आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी (कळवण) आणि तहसीलदारांना या प्रकरणाची (Case) सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
चौकशीत धक्कादायक माहिती समोर
ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी चौकशी समितीसमोर दिलेल्या माहितीनुसार, चांदी काढताना कोणताही पंचनामा, अधिकृत वजन किंवा सीलबंद करण्याची प्रक्रिया पार पाडली गेली नाही. यामुळे या प्रकरणातील संशयाची सुई जबाबदार अधिकाऱ्यांकडे वळली आहे. तसेच, माहिती अधिकारांतर्गत विचारलेली माहिती देण्यासही ट्रस्टने नकार दिल्याने हे प्रकरण आता राज्य माहिती आयोगाकडे पोहोचले आहे.
आंदोलनानंतर प्रकरणाला वाचा
विठोबा द्यानद्यान, विधिज्ञ सुरेंद्र सोनवणे, छगन जाधव आणि माजी सरपंच बेबीबाई जाधव यांनी जानेवारी २०२६ पासून या विरोधात लढा सुरू केला होता. या प्रकरणी दोषींवर भादंवि कलम ४०९, ४२०, १२० (ब) अंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करण्याची आणि गायब चांदीची रक्कम व्याजासह वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे. सप्तशृंगी देवी हे कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथील मौल्यवान चांदी ही भाविकांच्या श्रद्धेची ठेव आहे. या संपत्तीच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्यांकडूनच असा गैरप्रकार होणे वेदनादायक आहे. सत्य बाहेर येऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी, हीच आमची मागणी आहे.
विठोबा द्यानद्यान, माहिती अधिकार कार्यकर्ते





