
कर्जत |प्रतिनिधी| Karjat
कुकडी व सिना प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील कालव्यांची दुरूस्ती, क्षमता वाढ आणि शेतकर्यांच्या सिंचनाशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबध्द असून, कालव्यांच्या दुरूस्तीसाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. तसेच प्रकल्पातील भूसंपादन मोबदल्याच्या प्रलंबित प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत कुकडी व सिना प्रकल्प लाभक्षेत्रातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी कर्जत येथे मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी विविध गावांतील शेतकरी, प्रकल्पग्रस्त तसेच संबंधित विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांनी कालव्यांची दुरूस्ती, कालव्यांच्या मोजणीतील अडचणी, भूसंपादनाचा मोबदला, कमांड एरियातील शेतीला नियमित पाणीपुरवठा, तसेच प्रकल्पाशी संबंधित अन्य प्रश्न उपस्थित केले. पालकमंत्र्यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेत संबंधित अधिकार्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले की, कुकडी प्रकल्प हा जिल्ह्यातील अनेक गावांसाठी जीवनदायी ठरलेला महत्त्वाचा सिंचन प्रकल्प आहे. भविष्यात वाढणारी पाण्याची गरज लक्षात घेता कालव्यांची वहन क्षमता वाढविणे अत्यावश्यक आहे. यापूर्वीही कालव्यांच्या दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र, आता दीर्घकालीन नियोजनाच्या दृष्टीने संपूर्ण प्रकल्पाचे सर्वेक्षण करून आवश्यक त्या सुधारणांचा आराखडा तयार करणे गरजेचे आहे. यासाठी संबंधित विभागाने पुढील तीन महिन्यांत कालव्यांचे सर्वेक्षण पूर्ण करून सविस्तर तांत्रिक अहवाल सादर करावा. त्या अहवालाच्या आधारे कालव्यांच्या दुरूस्तीबरोबरच क्षमतावाढीची कामे हाती घेऊन त्यासाठी आवश्यक निधी शासनामार्फत उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
भूसंपादन मोबदल्याबाबतमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘दुष्काळमुक्त महाराष्ट्र’ घडविण्याचा संकल्प केला असून तो प्रत्यक्षात आणण्यासाठी जलसंपदा विभागामार्फत विविध सिंचन प्रकल्प अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कुकडी प्रकल्पातील भूसंपादन व मोबदल्याबाबत अनेक शेतकर्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची दखल घेत हा विषय मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर मांडून त्यावर सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. शासन शेतकर्यांच्या हितासाठी कायम सकारात्मक भूमिका घेईल, अशी ग्वाहीही विखे पाटील यांनी दिली.




