जिमाका वृत्तसेवा
आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ सुरळीत, सक्षम आणि दर्जेदार पद्धतीने पार पाडण्यासाठी स्थानिक युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था (एमएसएसडीएस) यांनी ‘कुंभ स्किलिंग प्रकल्पा’ला मंजुरी दिली असून, या अंतर्गत ४ हजार ३०० युवकांना विविध क्षेत्रांतील कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
या प्रकल्पांतर्गत अल्पकालीन कौशल्य प्रशिक्षण, विद्यमान कौशल्यांचे उन्नयन (अपस्किलिंग), उद्योजकता विकास तसेच रिकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग (आरपीएल) या माध्यमांतून प्रशिक्षण दिले जाणार आहे. पर्यटन, आदरातिथ्य सेवा, आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधा या कुंभमेळ्याशी निगडित क्षेत्रांसाठी आवश्यक मनुष्यबळ तयार करण्यावर भर दिला जाणार आहे.
या प्रशिक्षणामध्ये पर्यटन मार्गदर्शक, गेस्ट सर्व्हिस असोसिएट, होमस्टे व्यवस्थापन, प्रथमोपचार व आपत्कालीन प्रतिसाद, उद्योजकता विकास, शेफ, फूड अँड बेव्हरेज सर्व्हिस, जनरल ड्युटी असिस्टंट (आरोग्य सेवा), इलेक्ट्रिशियन तसेच अनुभवी कामगारांसाठी आरपीएल प्रशिक्षणाचा समावेश आहे.
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त मंगळवारी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या प्रकल्पासाठीचे लेटर ऑफ इंटेंट (एलओआय) प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमाला कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा वर्मा, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेचे आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या प्रकल्पाची अंमलबजावणी सह्याद्री फार्म्स-टाटा स्ट्राईव्ह स्किल डेव्हलपमेंट सेंटर यांच्या माध्यमातून केली जाणार आहे. सह्याद्री फार्म्सतर्फे सुरेश नखाते यांनी तर टाटा स्ट्राईव्हतर्फे संतोष डोंगरे आणि गौरव गुप्ता यांनी लेटर ऑफ इंटेंट स्वीकारले.
डॉ. अमित सैनी म्हणाले, “जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यांपैकी एक असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कौशल्यपूर्ण मनुष्यबळ तयार करून या आयोजनात योगदान देताना कौशल्य विकास विभागाला अभिमान वाटतो. या उपक्रमामुळे कुंभमेळ्याच्या तयारीलाही अधिक बळकटी मिळेल.”
यावेळी बोलताना कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे स्थानिक नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होणार आहेत. या संधींचा लाभ स्थानिक युवकांना मिळावा यासाठी त्यांना आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. ‘कुंभ स्किलिंग प्रकल्प’ या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणार असून, प्रशिक्षित मनुष्यबळ तयार झाल्याने भाविकांना अधिक दर्जेदार सेवा उपलब्ध होतील.”




