नाशिक । प्रतिनिधी Nashik
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या प्रस्तावित घटना दुरुस्तीवरून विशेष सर्वसाधारण सभेत सभासदांनी तीव्र आक्षेप नोंदविले. वारस सभासदत्वासाठी आकारण्यात येणारे शुल्क, संचालक मंडळाची संख्या कमी करताना तालुका प्रतिनिधित्वात करण्यात आलेली कपात तसेच वारस सभासदांना निवडणूक लढविण्यासाठी घालण्यात आलेली अट या मुद्द्यांना सभासदांनी विरोध दर्शविला.शैक्षणिक विस्ताराला प्राधान्य देण्याची आग्रही मागणीही करण्यात आली.
घटना दुरुस्तीच्या मसुद्यावर चर्चा करण्यासाठी संस्थेने मंगळवारी (दि.२४) संस्थेच्या येथील महाविद्यालयाच्या प्रांगणा बोलाविलेल्या विशेष सभेत तब्बल साडेतीन तास चर्चा झाली. यावेळी सभासदांनी विविध सूचना आणि हरकती मांडल्या. सभासदांनी सुचविलेल्या सर्व दुरुस्त्या आणि हरकतींची नोंद घेऊन घटना दुरुस्तीचा अंतिम मसुदा तयार करण्यात येईल. हा मसुदा पुढील महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर मंजूर मसुदा धर्मादाय आयुक्तांकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांनी सभेत दिली.
संस्थेच्या घटनेत सुमारे २७ ते २८ वर्षांनंतर दुरुस्ती करण्याचा निर्णय विद्यमान संचालक मंडळाने घेतला आहे. सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार ही प्रक्रिया राबविण्यात येत असून, भविष्यातील गरजा आणि संस्थेचे दीर्घकालीन हित लक्षात घेऊनच घटना दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे सभासदांनी याबाबत योग्य त्या सूचना मांडाव्यात, त्याचे स्वागत करण्यात येईल, असे सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी प्रास्ताविकात सांगितले.
माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांनी वारस सभासदत्वासाठी सर्वसमावेशक शुल्क ठेवण्याची सूचना केली. ज्येष्ठ सभासदांना वयोमानानुसार आपले सभासदत्व वारसाला हस्तांतरित करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. नांदगाव व येवला तालुक्यांतील सभासदांचे संस्थेतील योगदान लक्षात घेता संचालक मंडळाची संख्या किंवा तालुकानिहाय प्रतिनिधित्व कमी करू नये. तसेच निवडणूक लढविण्यासाठी वयाची अट ठेवू नये, असे स्पष्ट केले. माजी आमदार अशोक धात्रक यांनी संचालक व पदाधिकारी निवडणूक लढविण्यासाठी वय किंवा सभासदत्वाचा कालावधी याबाबत बंधने असू नयेत, असे मत मांडले. पदाधिकारी व संचालकांनी दोन कार्यकाळांनंतर निवडणूक लढविण्याबाबत संस्थेच्या हितासाठी नैतिकतेच्या भूमिकेतून स्वतःहून निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
अॅड. भाऊसाहेब गंभीरे यांनी घटना दुरुस्ती करताना केवळ वारस सभासदत्व आणि कार्यकारी मंडळाची संख्या यापुरता विचार न करता संस्थेच्या शैक्षणिक उद्दिष्टांना प्राधान्य देण्याची सूचना केली. वैद्यकीय आणि कृषी शिक्षणाची पदवी देणारी शैक्षणिक युनिट सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, सभासदांचे अधिकार स्पष्ट करावेत, तसेच गंभीर गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेल्या सभासदांच्या सदस्यत्वाबाबत योग्य तरतूद करावी, असे त्यांनी सांगितले.
चर्चेदरम्यान वारस सभासदत्वासाठी सर्वसमावेशक शुल्क, संचालक मंडळाचे विद्यमान कार्यकारी मंडळाचे संख्याबळ कायम ठेवण्याबरोबरच विश्वस्त पदांची संख्या कमी करण्याचे स्वागत केले. मात्र, तालुकानिहाय प्रतिनिधित्व कमी न करणे, तसेच संचालक व पदाधिकाऱ्यांसाठी १० व ४० वर्षांची वयोमर्यादा रद्द करण्याच्या सूचना करण्यात आल्या. वारस सभासदत्वासाठीची अट ठेवण्याच्या प्रस्तावालाही विरोध करण्यात आला. संचालक व पदाधिकाऱ्यांसाठी निवडणूक लढविताना किमान बारावी किंवा पदवीधर शैक्षणिक पात्रता निश्चित करावी, सलग तीन सभांना गैरहजर राहणाऱ्या निष्क्रिय सभासदांचे सदस्यत्व रद्द करून नवीन सभासदांना संधी द्यावी, अशी मागणीही झाली.
तालुकास्तरावरच मतदानाची व्यवस्था करून संबंधित तालुक्यातील संचालकाला मतदानाचा अधिकार द्यावा, पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ निश्चित करावा आणि खजिनदार पदाची निर्मिती करावी, अशा सूचनाही मांडण्यात आल्या. महिला प्रतिनिधींची संख्या दोनच ठेवावी, सभासदांना स्मार्ट ओळखपत्र द्यावे आणि सभासदांच्या नावांची पडताळणी करावी, अशी मते व्यक्त झाली.
सभासद शुल्क पाच हजार रुपये ठेवावे, देणगीदारांसाठीची २१ लाख रुपयांची मर्यादा कमी करून पाच लाख रुपये करावी, तर २१ लाख रुपये देणगी देणाऱ्या दात्याचे नाव संस्थेच्या एखाद्या शाखेला द्यावे, अशी सूचनाही करण्यात आली. संस्थेच्या विस्तारासाठी कृषी व एमबीबीएससारखे शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार करावा. घटना दुरुस्ती ही केवळ निवडणूक आणि सत्ताकारणापुरती मर्यादित न ठेवता संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीला दिशा देणारी असावी, असा सूर चर्चेत उमटला.
या चर्चेत माजी आमदार बाळासाहेब सानप, अॅड. पी.आर. गिते, बाळासाहेब गामणे, बाळासाहेब सोनवणे, डॉ. धर्माजी बोडके, प्रभाकर धात्रक, सुरेश घुगे, रवी डोमाडे, भागिनाथ घुगे, वसंत वाघ, संतोष कथार , चंद्रकांत सांगळे, अॅड. विलास आंधळे, किरण काकड, राजेंद्र दराडे, अर्जुन वाघ, डॉ. कुटे, जे. डी. केदार, संदीप फड, संजय नागरे, उत्तमराव कातकाड़े आदींनी सहभाग घेत विविध सूचना मांडल्या.




