नाशिक । प्रतिनिधी Nashik
जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कामकाजात शिस्त आणण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांना डावलून ठेकेदार थेट फाईल घेऊन स्वाक्षरीसाठी येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. यापुढे कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणाकडेही फाईल आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
जिल्हा परिषदेचे नवीन इमारतीत स्थलांतर झाल्यानंतरही बांधकाम विभाग जुन्या इमारतीतच कार्यरत होता. त्यामुळे जुन्या इमारतीतून नवीन इमारतीपर्यंत फाईल हातोहात नेण्याची पद्धत सुरू झाली होती. आता बांधकाम विभागही नवीन इमारतीत स्थलांतरित झाला असतानाही ठेकेदारांकडून थेट फाईल अधिकाऱ्यांसमोर ठेवण्याचे प्रकार सुरूच आहेत. काही ठेकेदार तर फाईलमधील मोजकीच कागदपत्रे घेऊन स्वाक्षरीसाठी आग्रह धरत असल्याचे समोर आले आहे.
अर्धवट फाईल किंवा आवश्यक कागदपत्रांशिवाय स्वाक्षरी कशी करायची, असा सवाल करत अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. सलग दोन ठेकेदार फाईल घेऊन आल्याचे प्रकार अवघ्या पाच मिनिटांच्या अंतराने घडले. यावेळी जिल्हा परिषदेचे एक माजी सदस्यही उपस्थित होते. या प्रकारानंतर संगमनेरे यांनी बांधकाम विभागातील संबंधित कर्मचाऱ्यांना बोलावून घेत जाब विचारला. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले.
स्वतंत्र निविदा सेलची निर्मिती
जिल्हा परिषदेच्या तिन्ही बांधकाम विभागांच्या निविदा प्रक्रिया एकाच ठिकाणी राबविण्यासाठी स्वतंत्र निविदा सेल निर्माण करण्याचा विचार प्रशासनाकडून सुरू आहे. यामुळे फाईलचा प्रवास कमी होऊन कामकाजात सुसूत्रता येईल. तसेच ठेकेदारांना स्वतः फाईल घेऊन अधिकाऱ्यांकडे जाण्याची आवश्यकता राहणार नाही.




