मुंबई | Mumbai
महायुतीकडून राज्यातील महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या बहुचर्चित ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करण्यात येईल अशी हामी महायुतीच्या सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आपल्या जाहीरनाम्यात दिली होती. राज्यात महायुतीचे सरकार आले तर ही योजना बंद पडेल, निवडणुकीसाठीच ही योजना सुरू करण्यात आली असा आरोप देखील महाविकास आघाडीकडून करण्यात आला होता, याला आता पुन्हा एकदा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. लाडकी बहीण ही योजना सुरूच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भाजपचे नेते तथा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या रक्कमेत महायुतीकडून निश्चित वाढ होणार असून ही वाढ कधी होईल याबद्दल माहिती देण्यात आली आहे.त्यामुळे आता महायुतीची सत्ता स्थापन झाल्यावर लवकरच राज्याच्या लाडक्या बहिणींसाठी गोड बातमी देण्यात येईल अशी शक्यता आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले की, ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांच्यावर आहे, अशा लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. लाडक्या बहीण योजनेत कर भरणाऱ्या महिलांचा अर्ज अपेक्षित नाहीये. लाडक्या बहीण योजनेसाठी जे आधीचे निकष आहेत, तेच कायम राहणार आहेत. दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांच्या या वक्तव्यानंतर आता ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखांच्या वर आहे किंवा ज्या महिला कर भरतात मात्र तरी देखील त्यांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे, त्यांचे अर्ज बाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुढे ते असे ही म्हणाले की, लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने ४५,००० हजार कोटींचे बजेट ठेवले होते. आता यामध्ये वाढ करावी लागणार आहे. असा कोणीही तर्क काढला नाही. मला मुलाखतीत विचारलं, २१०० रुपये कधी वाढणार. मी त्यांना म्हटलं, हा निर्णय मंत्रिमंडळाचा असतो. बजेटमध्ये वाढवायचं, रक्षाबंधनाला सुरु झाली, रक्षाबंधनाच्या दिवशीपासून वाढवायचा, हा निर्णय मंत्रिमंडळाचा असतो. पुढच्या वर्षात निश्चितपणे वाढेल, इतकीच प्रतिक्रिया मी दिली. पण काही लोकांनी त्याचा विपर्यास केला, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले. लाडक्या बहीण योजनेचे २१०० रुपये करण्याचे आश्वासन भाजपच्या संकल्पपत्रात आहे. पैसे वाढवले नाहीत तर मी स्वत: पत्र लिहेन असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.