उंबरे | Umbare
राज्य शासनाने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला ब्रेक लागला असून नवीन ई केवायसी होत नसल्यामुळे या योजनेचे हप्ते थकले आहेत. यामुळे अनेक लाडक्या बहिणी योजनेपासून वंचित राहिल्या असून शासनाने तात्काळ ईकेवायासी प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी वंचित लाडक्या बहिणींकडून होत असून त्यांच्या मध्ये नाराजी पसरली आहे.
राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना 1 हजार 500 रुपये इतका आर्थिक लाभ महा.डीबीटीद्वारे बँक खात्यात देण्यात येत होता. नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा, यासाठी ईकेवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली, तिची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत होती. पण ही प्रक्रिया करताना काही महिलांनी चुकीचे पर्याय निवडले, परिणामी योजनेच्या लाभापासून त्यांना वंचित राहावे लागले. पात्र असतानाही लाभ न मिळालेल्या महिलांना ईकेवायसी दुरुस्ती करण्याची संधी 31 मार्च 2026 पर्यंत सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आली.
परंतु योजनेमध्ये यापूर्वी लाभ घेत असलेल्या अशा अनेक महिला आहेत, त्या पात्र असूनही त्यांनी अज्ञान व पुरेशी माहिती नसल्याने ईकेवायसी पूर्ण केली नाही. परिणामी त्या महिलांना दरमहा मिळणारा लाभ डिसेंबर महिन्यापासून बंद झाला. डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्याची रक्कम लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात आजपर्यंत प्राप्त झाली नाही कित्येक महिला या योजनेपासून वंचित राहिल्याने लाभ पूर्णतः बंद असल्याचे वास्तव समोर आले आहे.
असंख्य पात्र महिलांचा लाभ केवळ ईकेवायसी केली नसल्याने बंद झाला. लाभ बंद झालेल्या महिलांनी नाराजी व्यक्त केली असून शासनाला फक्त मतदानापुरतीच लाडक्या बहिणींची आठवण येते का ? आम्ही काय सावत्र बहिणी आहोत काय ? असा सवाल त्या विचारत आहेत. शासनाने महिला आणि बालविकास विभागाच्यावतीने यापूर्वी ईकेवायसी पूर्ण करू न शकलेल्या महिलांसाठी वेबपोर्टलवर संधी उपलब्ध करून द्यावी किंवा अंगणवाडी सेविकांमार्फत ईकेवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
माझ्या बँक खात्यात यापूर्वी दर महिन्याला 1 हजार 500 रुपये येत होते. गेल्या तीन महिन्यांपासून एक रुपयाही आलेला नाही. मागील महिन्यात सेतू चालकाकडे गेले. पण केवायसीची मुदत संपली आहे, असे सांगण्यात आले आहे.
– सौ. शोभा पवार (पूर्वीची लाभार्थी महिला, खडांबे)
ईकेवायसी पूर्ण न केलेल्या अनेंक महिला माझ्याकडे दररोज येतात. माझ्या बँक खात्यात पैसे आले नाही म्हणून सांगतात. परंतु नवीन ईकेवायसी करण्याची प्रक्रिया शासनाने बंद केलेली आहे. फक्त चूका दुरुस्त करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. असे स्पष्ट नाईलाजाने सांगावे लागते. तेव्हा त्या प्रचंड नाराज होतात. ग्रामीण भागातील बर्याच आर्थिक दुर्बल महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याने शासनाने पुनःएकदा एकदा त्यांना संधी देणे अपेक्षित आहे.
– (सेतूचालक)





