Lalbaugcha Raja Visarjan 2025 : लालबागचा राजा २० तासांच्या मिरवणुकीनंतर गिरगाव चौपाटीवर; मात्र विसर्जनात विघ्न, नेमकं कारण काय?

0
126

मुंबई | Mumbai

अनंत चतुर्दशीला ( दि. ६ सप्टेंबर, शनिवार) लालबागच्या राजाची (Lalbaugcha Raja 2025) विसर्जन (Visarjan) मिरवणूक ही काल सकाळी दहा वाजता निघाली होती. आता याला २४ तास उलटले आहेत. मात्र, अद्यापही लालबागच्या राजाचे विसर्जन झालेले नाही. लालबाग राजाची मूर्ती अत्याधुनिक तराफ्यावर चढवताना अनेक अडचणी येत आहेत. यामुळे विसर्जनाला विलंब झाला आहे.

गिरगाव चौपाटीवर (Girgaon Chowpaty) सकाळी साडे सात वाजताच्या सुमारास लालबागचा राजा पोहोचला. यंदा लालबाग राजाच्या विसर्जनासाठी आधीपेक्षा दुप्पट आकाराचा अत्याधुनिक तराफा दाखल करण्यात आला आहे. मात्र या तराफ्यावर बाप्पाची मूर्ती चढविण्यात अनेक अडचणी येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे गेल्या तासभरापासून लालबाग राजाचा बाप्पा गिरगावच्या किनारपट्टीवर ताटकळत असल्याचे चित्र दिसत आहे.

गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचे आज सकाळी आगमन झाले त्यावेळी भरतीचे पाणी वेगाने वाढत होते. त्याचवेळी गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजाचे तराफ्याजवळ आगमन होताच वेगाने वाढलेल्या भरतीच्या पाण्यामुळे लालबागचा राजाच्या मूर्तीचा पाट तरंगू लागला. त्याचा परिणाम असा झाला की लालबागच्या राजाला खोल समुद्रात नेणारा अत्याधुनिक तराफा आणि मूर्तीचा पाट यांची भरतीच्या पाण्याच्या हेलकाव्यांमुळे जुळणी होत नव्हती.

दरम्यान, दीड तास कोळी बांधव सातत्याने लालबागच्या राजाचा पाट आणि तराफा यांची जुळणी करण्याचा आटोकाट प्रयत्नं करत आहेत. मात्र भरतीच्या पाण्याचा दबाव प्रचंड वाढल्यामुळे भरतीचे पाणी कमी होण्याची वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आता लालबागच्या राजाचे विसर्जन (Visarjan) समुद्राच्या भरतीचे पाणी थोडे कमी झाल्यावर करण्यात येईल, असे बोलले जात आहे.