Tuesday, April 14, 2026
Homeक्राईमCrime News : जमिनीच्या वादातून गावठी कट्ट्याने हवेत गोळीबार

Crime News : जमिनीच्या वादातून गावठी कट्ट्याने हवेत गोळीबार

काटेवाडीत दोन कुटुंबांत हाणामारी, तलवार-पाईपचा वापर || परस्परविरोधी गुन्हा

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील काटेवाडी गावात गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या जमिनीच्या वादातून बुधवारी (दि.7) सायंकाळी भीषण हिंसक संघर्ष झाला. या घटनेत उगलमुगले व ढाकणे या दोन कुटुंबांतील सदस्य गंभीर जखमी झाले असून, दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

नवनाथ नामदेव उगलमुगले (वय 55, रा. काटेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक 7 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान श्रीधर रघुनाथ ढाकणे यांच्या घरासमोर रस्त्यावर अंबादास मुरलीधर ढाकणे, रामदास मुरलीधर ढाकणे, अर्जुन गंगाधर ढाकणे, विनय रामदास ढाकणे व योगेश नामदेव ढाकणे (सर्व रा. काटेवाडी, ता. पाथर्डी) यांनी त्यांना व त्यांचे पुत्र ज्ञानेश्वर व गणेश यांना अडवून शिवीगाळ व दमदाटी केली.

रामदास मुरलीधर ढाकणे याने लोखंडी पाईपने वार करत नवनाथ उगलमुगले यांच्या डाव्या हाताचे हाड मोडले. योगेश नामदेव ढाकणे याने ज्ञानेश्वर उगलमुगले याला धरून ठेवत त्याच्या डोक्यावर लोखंडी पाईपने वार केल्याचा आरोप आहे. तसेच सर्व आरोपींनी गणेश उगलमुगले याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेत उगलमुगले कुटुंबाच्या दोन मोटारसायकली फोडून नुकसान करण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. जिवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, रामदास मुरलीधर ढाकणे (वय 47, रा. काटेवाडी) यांनी दिलेल्या प्रति फिर्यादीनुसार, 7 जानेवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास नवनाथ नामदेव उगलमुगले, वैजयंता नवनाथ उगलमुगले, ज्ञानेश्वर नवनाथ उगलमुगले, गणेश नवनाथ उगलमुगले, दादासाहेब मल्हारी उगलमुगले (सर्व रा. काटेवाडी) व सचिन नारायण किर्तने (रा. किर्तनवाडी, ता. पाथर्डी) यांनी त्यांना, भाऊ अंबादास मुरलीधर ढाकणे व मुलगा विजय यांना तलवारीने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला.

नवनाथ उगलमुगले याने तलवारीने डोक्यावर वार केल्याने रामदास ढाकणे गंभीर जखमी झाले. ज्ञानेश्वर उगलमुगले याने आंबादास ढाकणे यांच्या पोटावर तलवारीने वार केल्याचा आरोप आहे. तसेच नवनाथ उगलमुगले याने गावठी कट्ट्याने हवेत गोळीबार केल्याचा गंभीर दावा प्रतिफिर्यादीत करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपी स्विफ्ट कारमधून पसार झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. घटनेनंतर सर्व जखमींना प्रथम पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात व त्यानंतर अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाथर्डी पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंच्या तक्रारीनुसार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : १४ एप्रिल २०२६ – भोळी आशा अखेर विफल

0
पाकिस्तान नामक अचानक उदयास आलेल्या नव्या शांततेच्या मसीहाच्या मध्यस्थीनिशी अमेरिका आणि इराण यांच्यात इस्लामाबादेतील शांतता चर्चेबद्दल फारशी अपेक्षा कोणालाही नव्हतीच; तरीही आखातात दीड महिन्यापेक्षा...