अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शेतजमीन, मालमत्ता खरेदी- विक्रीच्या वाढत्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी मूळ मालकाचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबरची जोडणी अधिकार अभिलेखाला करण्याचा महत्वाकांक्षी ‘अॅग्रिस्टॅक’ प्रकल्प भूमिअभिलेख आणि महसूल विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविला जाणार आहे. शेतकर्यांचे ओळखपत्र तयार केले जाणार आहे. त्यात शेतकर्याचे नाव, त्याच्या जमिनीची माहिती व आधार आणि मोबाईल क्रमांक जोडला जाणार आहे. तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी यांना येत्या काही दिवसांमध्ये ‘अॅग्रिस्टॅक’ या मोहिमेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्षात ग्रामपातळीवर तलाठी या कामाला सुरूवात करणार आहेत. या मोहिमेला शेतकर्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांनी केले आहे.
शेतजमीन, मालमत्ता यांचे मालक असण्याची सरकार रेकॉर्डनुसार कागदोपत्री असलेली नोंद ही ओळख आहे. बहुतांश वेळेस जमिनीचा मालक बाहेरगावी असल्यास काही लोकांकडून या जमिनीची परस्पर विक्री केली जाते. त्यासाठी तोतया व्यक्तीचे बनावट कागदपत्रे तयार केले जाते. त्यावरून विक्री केली जाते. मालकाच्या संमतीशिवाय शेत जमीन, मालमत्ता परस्पर विक्री होण्याचे गैरप्रकार अलिकडच्या काळात वाढत चालले आहे. यामध्ये मालमत्ता घेणार्याचीही मोठी आर्थिक फसवणूक होत आहे. या गैरप्रकारांना लगाम लावण्यासाठी भूमी अभिलेखांना आधार जोडणी करण्याची परवानगी द्यावी. असा प्रस्ताव भूमिअभिलेख विभागाने केंद्र सरकारकडे दिला होता. त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
एखादा शेतकरी जमिनीचा मालक असल्याची ओळख या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य सरकारला पटवून दिली जाणार आहे. त्यासाठी तलाठ्याकडे समक्ष जाऊन जमिनीची नोंद केली जाईल. जमिनीचा मालक हा तोच शेतकरी असल्याची खात्री तलाठी कोतवालाकडून करतील. शेतकर्याची ओळख निर्माण करण्यासाठी त्याचा आधार व मोबाइल क्रमांक जोडला जाईल. जमिनीचे मालक असण्यासाठी अधिकार अभिलेखाला आधार आणि मोबाइल क्रमांक जोडला जाणार आहे. त्यातून जमिनीचे मालक असल्याचे सिध्द होऊन व्यवहारांबाबत होणारी फसवणूक टळणार आहे.
ओटीपी दिल्यानंतरच व्यवहार पूर्ण होणार
जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये अनेकांची फसवणूक होत आहे. याला आळा घालण्यासाठी सरकारने ही योजना आणली आहे. आता अभिलेखाला आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक जोडल्याने अशा व्यवहाराची माहिती संबंधित शेतकर्याला असावी, यासाठी भूमिअभिलेख विभागाकडून एसएमएसव्दारे ओटीपी दिला जाईल. हा ओटीपी दिल्यानंतरच व्यवहार पूर्ण होणार आहे. यामुळे फसवणुकीला आळा बसण्यास मदत होणार आहे.