Sunday, July 5, 2026
Homeनगरबिल्डरलाईन स्टार्टअप

बिल्डरलाईन स्टार्टअप

पतसंस्था, विमा ऑफिसही सुरू । लॉकडाऊनच्या मुलभूत तत्वांचे पालन बंधनकारक

अहमदनगर (प्रतिनिधी) – लॉकडाऊनच्या मुलभूत तत्वांचे पालन करणे बंधनकारक करत कन्टेन्मेन्ट झोन वगळता जिल्हा प्रशासनाकडून विविध उद्योगांना अटी, शर्तीसह परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सविस्तर आदेश जारी केला असून नागरिकांना नियमांचे पालन करीत आदेशाची अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट केले आहे. महिनाभरापासून बंद असलेली नगर शहरातील बिल्डरांची बांधकामं अटी-शर्तींवर सुरू करण्यास कलेक्टरांनी परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे नगरमधील बिल्डरलाईन स्टार्टअपच्या मार्गावर आली आहे.

- Advertisement -

ज्या अतिरिक्त बाबींना परवानगी देण्यात आली आहे त्यात, कृषी, आस्थापना, सामाजिक क्षेत्र, वन उत्पादन, मत्स्य उत्पादन आणि पशुसंवर्धन, वित्तीय क्षेत्र, मनरेगा, सार्वजनिक सोयीसुविधा, बांधकामासह विविध बाबींचा समावेश आहे.

शहरातील कंटेनमेंट झोन वगळून बांधकाम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सोशल डिस्टन्सिंग विषयक नियमांसह अन्य बाबींचे काटेकोरपणे पालन करण्याची अट घालण्यात आली आहे. कामगारांची राहण्याची आणि दैनंदिन गरजांची सोय बांधकाम ठिकाणीच करणं बंधनकारक आहे. अटींचे पालन काटेकोरपणे होत नसल्याचे आढळून आल्यास दिलेली परवानगी रद्द होणार आहे. नागरिकांसाठी संचारबंदी कायम असून खासगी वाहनांनाही बंदी कायम आहे.

जिल्ह्यातील अहमदनगर महानगरपालिका, सर्व नगरपालीका/नगरपंचायत व अहमदनगर कॅटोन्मेंट बोर्ड हद्दीमध्ये सर्व खाजगी वाहने व सर्व खाजगी प्रवासी वाहतुक करणार्‍या वाहनाच्या वाहतुकीत प्रतिबंध 30 एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे. पेट्रोल, डिझेल विक्रीसंदर्भात कलेक्टरांनी काढलेला पूर्वीचा आदेश कायम राहणार आहे. औषधे व औषधेतर वस्तूंच्या विक्रीबाबत आदेश 3 मे पर्यंत कायम असणार आहे.

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील सर्व कामे सुरु राहतील व योजनेत काम करणारे सर्व कर्मचारी/मजूर यांनी काम करताना मास्कचा वापर करावा, तसेच मनरेगाची कामे हाती घेताना जलसिंचन व जलसंधारण विभागातील कामांना प्राधान्य देण्यात यावे.

पेट्रोल, डिझेल, केरोसीन, सीएनजी, एलपीजी, पीएनजी आदी इंधन आणि गॅस क्षेत्रातील रिफिलींग, वाहतूक, वितरण, साठवणूक व विक्री सुरू राहील (पेट्रोल विक्रीची वेळ सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत व डिझेल, सीएनजी विक्रीची वेळ सकाळी 5 ते दुपारी 12 वाजेपर्यंतच राहील).

विज निर्मिती, पारेषण व वितरण सुरू राहील. पोस्टल सेवा (पोस्ट ऑफिस सहीत), कुरिअर सेवा देणार्‍या आस्थापना, टेलीकम्युनिकेशन व इंटरनेट सेवा सुरू राहतील.
महापालिकांसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थामधील पाणी पुरवठा, स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाची कामे सुरू राहतील.

दुष्काळ, टंचाई यांच्या निवारणासाठीची सर्व कामे सुरू राहतील. उदा. टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे, वाहनाद्वारे पशुखाद्य पुरवठा करणे. सर्व वस्तू व मालाची वाहतूक, ने-आण करता येईल. रेल्वेद्वारे वस्तू, माल, पार्सल यांची ने-आण करता येईल.

सर्व प्रकारचे वस्तू व माल वाहतूक करणारे ट्रक व तत्सम वाहने हे वाहतूक करतांना केवळ दोन चालक व एक हेल्पर यांच्यासोबतच वाहतूक करतील. तसेच माल, वस्तू पोहोच केल्यानंतर रिकाम्या झालेल्या वाहनांना देखील वाहतुकीसाठी परवानगी असेल, तथापि वाहन चालवणार्‍यांकडे वैध परवाना असणे अनिवार्य राहील.

ट्रक व तत्सम माल वाहतूक करणार्‍या वाहनांची दुरुस्ती करणारी दुकाने सुरू राहतील. तथापि संबंधितांना केंद्र व राज्य शासनाच्या सूचना, आदेश, निदेर्शांचे गांभीर्याने पालन करावे लागेल व लॉकडाऊनचे नियम पाळावे लागतील.

रेल्वे वाहतुकीच्या ठिकाणी कामावर जाणारे अधिकारी/कर्मचारी, कंत्राटी कामगार यांना संबंधित आस्थापना यांनी दिलेल्या अधिकृत ओळखपत्र सोबत बाळगूनच कामावर हजर राहता येईल.

रस्ते बांधणी, सिंचन प्रकल्प, सर्व प्रकारच्या औद्योगिक प्रकल्पांची बांधकामे (ग्रामीण ाागातील सुक्ष्म, लघू व मध्यम प्रकल्पासहीत), पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा करणार्‍या तारा ओढणे, ऑप्टीकल केबल/ फायबर यांचेशी संबंधित बांधकामे सुरु राहतील. तथापि संबंधित कामांची पडताळणी त्या त्या विभागातील संबंधित अधिकारी यांनी करावी.

तसेच या प्रकारच्या कामावर असणार्‍या मजुरांची जेवण व राहण्याची सोय संबंधित ठेकेदार यांनीच करावी व सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाईल, याची दक्षता घ्यावी. कामाच्या ठिकाणी हात धुण्यासाठी पुरेशी सुविधा, मास्क, सॅनिटाईजर्स उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदार यांची राहील.
अत्यावश्यक मान्सूनपूर्व कामे, रिन्यूएबल उर्जा प्रकल्पांची कामे सुरु राहतील.

ज्या ठिकाणी कामावर कामगार उपलब्ध आहेत व बाहेरील ठिकाणाहून कामगार आणण्याची परवानगी आवश्यकता नाही, अशा प्रगतीपथावर असणार्‍या बांधकाम प्रकल्पांची महानगरपालिका व नगरपालिका हद्दीतील कामे सुरू राहतील. तथापि कोणत्याही नव्या कामास परवानगी असणार नाही.

लॉकडाऊनच्या मुलभूत तत्वांचे पालन करणे बंधनकारक आहे. उपरोक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंडसंहिता, 1860 (45)चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र राहील.

मार्केट कमिटीचे लिलाव सुरू
कृषी विषयाची सर्व कामे सुरू राहणार असून तुर, कापूस व हरारा खरेदी केंद्रे आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या यांचे व्यवहार सुरु राहणार आहेत. ज्या ठिकाणी फळे, भाज्या, धान्ये यांचा लिलाव होतो, अशा सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ घाऊक व्यापारी,अधिकृत /नोंदणीकृत खरेदीदार, शेतकरी यांनाच प्रवेश करण्याची मुभा राहील. लिलावांच्या ठिकाणी हात धुण्याची पुरेशी व्यवस्था, हॅण्ड वॉश, सॅनिटाईजर्स उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी सचिव,कृषी उत्पन्न बाजार समिती यांची असेल. तसेच लिलावाच्या ठिकाणी उपस्थित असणार्‍या सर्व संबंधितांना मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. आयुक्त, अहमदनगर शहर महानगरपालिका व नगरपालिका, नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्‍यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना आवश्यक ते सहकार्य करावे, असे आदेश कलेक्टरांनी काढले आहेत. कृषी संबंधित उपकरणे/यंत्रे यांची निर्मिती, वितरण व त्यांची किरकोळ विक्री करणारे सर्व दुकाने, दुरुस्ती करणारी सर्व दुकाने,खते, किटकनाशके व बी-बियाणांची दुकाने सुरू राहणार आहेत. पिक कापणी, मळणी, काढणी यांच्या वापरात येणारी यंत्रे आणि हारवेस्टर व तत्सम यत्रांना राज्यांतर्गत व आंतरराज्यीय वाहतूकीची परवानगी देण्यात आली आहे. शेतमाल वाहतूक व विक्री, बियाणे, खते व किटकनाशके यांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक व विक्रीला परवानगी देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Crime News : लग्नाचे खोटे आमिष दाखवून नर्सची 13 लाखांची फसवणूक

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका 33 वर्षीय खाजगी नर्सची तब्बल 13 लाख रुपये आणि तीन तोळे सोन्याने फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर...