कोट्यावधींचा खर्च टळला; यापुढेही साधेपणाने विवाह करण्याची पध्दत होणार रुढ ?
श्रीरामपूर (प्रतिनिधी)- विवाह म्हटलं की मोठा डामडौल, थाट, मानपान व प्रतिष्ठेपायी अनावश्यक खर्चाची होणारी लाखोंची उधळपट्टी. तर विवाहातील हा खर्चही नवरी मुलीच्याच बापाच्या माथी मारण्याची परंपरा आजही कायम असल्याने तो कर्जात बुडाल्याचे वास्तव आहे. मात्र सध्या करोना संकटाने डामडौल न करता अनेक विवाह साध्या पध्दतीने होऊन कोट्यावधींच्या खर्चाला आळा बसला आहे. करोना संकटाने घालून दिलेली साधेपणाची ही विवाह पध्दती यापुढेही कायम रुढ होणे गरजेची असल्याची चर्चा सध्या मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडत असलेल्या विवाह सोहळ्यात झडत आहे.
मागील काही दिवसांपासून देशात करोना महामारी सुरू आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर देश लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे नियोजित कार्यक्रम, यात्रा, दिंड्या, आठवडे बाजारही बंद करुन गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. तर याच पार्श्वभूमीवर थाटात होणार्या विवाहावरही बंदी घालून मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत शासन नियम पाळत विवाह करण्याबाबत आदेश दिलेले आहे. त्यामुळे करोना संकटामुळे अनेकांचे मोठ्या थाटामाटात लग्न करण्याचे स्वप्न अधुरे राहून साधेपणाने विवाह उरकून घेण्याची वेळ ओढावली. तर दुसरीकडे साधेपणाने विवाह घडून येत असल्याने लग्न समारंभात होणारा अनावश्यक लाखोंचा खर्च मात्र टळला आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटूंबाला साधेपणाची ही विवाह पध्दतीच चांगली वाटू लागली आहे.
मुलींचा घटता जन्मदर हा चिंतेचा विषय बनत चाललेला आहे. मुलींचे कमी झालेले प्रमाण तसेच मुलींचीही सर्वच क्षेत्रात असलेली आघाडी यामुळे त्यांच्याही अपेक्षा उंचावल्या आहे. त्यामुळे पूर्वीच्या काही जुनाट रुढी-परंपरांना छेद देत कुटूंबातून विवाह जमविताना मुलीचेही मत जाणून घेतले जात आहे. या फॉर्म्यूल्यामुळे सध्या अनेक ‘वर’ बोहल्यावर चढण्याच्या प्रतिक्षेतच राहून गेले आहे. दरम्यान, मागील काही महिन्यात अनेकांचे विवाह निश्चित करण्यात आले होते. गुरूंकडून मुहूर्तही शोधून मंगल कार्यालय बुकींग करण्यात आले होती. लग्नपत्रिका, आचारी, बॅण्ड, डिजे, यासह विविध बाबींची तयारी करण्यात आली होती. मात्र करोनाने मोठ्या लग्न कार्यावर बंदी आणली. पर्यायाने वधु-वराकडील कुटूंबांना लग्नाच्या पार्श्वभूमीवर नियोजित केलेले कार्यक्रम रद्द करण्याची वेळ आली आहे.
सध्या प्रशासनाकडून परवानगी घेऊन मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह उरकले जात आहे. मंदिर, वस्ती, झाडाखाली विवाह होत असल्याचे दिसत आहे. यातून लग्न समारंभात होणार्या अनावश्यक खर्चास फाटा दिला गेला आहे. तर लग्न समारंभात ‘वधु पक्षाकडून’ हॉटेल, मोठे मंगल कार्यालय, लॉन्स याठिकणी विवाह करण्याच्या मागणीसह इतर अपेक्षांनाही पायबंद घातला गेल्याने ‘नवरी’ बापाचा होणारा खर्चही वाचला आहे. तर अनेकांनी अशा खर्चातून काही रक्कम लॉकडाऊन काळात हाताला काम नसल्याने उपासमार होत असलेल्यांसाठी देऊ केल्याने त्यांचा खर्चही सार्थकी लागला आहे. एकंदरीतच करोना संकटाने घालून दिलेली साधेपणाने विवाहाची पध्दती भविष्यातही कायम रुढ राहणे गरजेचे आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
योग जुळले तर लॉकडाऊनमध्ये विवाह!
इतर वेळी पार पडणार्या विवाहात ‘वर पक्षाकडील’ मंडळींकडून वधु पित्याकडे विवाह सोहळ्यात अनेक मागण्या पूर्ण करण्याच्या अटी घातल्या जातात. त्यामुळे कर्ज, उसनवार करत कर्ज डोक्यावर घेऊन वधु पिताही अपेक्षांची पूर्तता करतो. मात्र सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने साधेपणाने विवाहाची अट घातली आहे. त्यामुळे सध्या तरी साधेपणाने विवाहामुळे खर्च कमी येत आहे. त्यामुळे ही अट सर्वसामान्य कुटूंबाना दिलासादायक असून यातून आर्थिक खर्चासही आळा बसणार आहे. त्यामुळे योग जुळले सध्याच्या लॉकडाऊनमध्ये विवाह उरकण्याचा मनोदय अनेक कुटूंबियांनी व्यक्त केला.
वधु-वरांना सोशल मिडियावरुन आशिर्वाद
करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे शहरातील अनेक नातेवाईक विवाहास येऊ शकले नाही तर मंगल कार्यालयात होणार्या विवाहास मोजकेच नागरिक उपस्थित राहण्याबाबत आदेश आहे. त्यामुळे अनेकजण सोशल मिडियाच्या माध्यमातून व्हिडीओ कॉलद्वारे वधु-वरांना आशिर्वाद देऊन विवाह सोहळ्याचा आनंद घेत आहे.




