Thursday, July 2, 2026
Homeक्राईमNashik Crime News : घरमालकांना लुटणारे 'बंटी-बबली' गजाआड; भाडेकरु बनून वास्तव्य, चाेवीस...

Nashik Crime News : घरमालकांना लुटणारे ‘बंटी-बबली’ गजाआड; भाडेकरु बनून वास्तव्य, चाेवीस लाखांचा मुद्देमाल जप्त

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहरासह (Nashik City) राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये आणि परराज्यांत भाडेकरू म्हणून राहून घरमालकांचा विश्वास संपादन करायचा आणि नंतर त्यांच्याच घरात डल्ला मारणाऱ्या एका सराईत पती-पत्नीला (बंटी-बबली) जेरबंद करण्यात अंबड गुन्हे शोध पथकाला (Ambad Crime Detection Squad ) यश आले आहे. नवनीत मधुकर नाईक (वय ४६) आणि स्मिता उर्फ प्रिया नवनीत नाईक (वय ४२, रा. भांडुप, मुंबई, सध्या रा. बोईसर, जि. पालघर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित पती-पत्नीची नावे आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यातील सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल व लॅपटॉपसह एकूण २४ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  

- Advertisement -

पोलीसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, दि. २४ मे २०२६ रोजी फिर्यादी जयेश नानासाहेब वाकचौरे (रा. सिडको, नाशिक) यांनी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीची तक्रार दाखल केली होती. त्यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहणाऱ्या पंकज कदम (बदलेले नाव) याने घरमालक घरी नसताना कुलूप उघडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले होते. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास करत असताना गुन्हे शोध पथकाने परिसरातील किराणा दुकान आणि डी-मार्ट येथील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यात महिला संशयिताचे फुटेज प्राप्त झाल्यानंतर, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांचे आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक निष्पन्न करण्यात आले. तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिसांनी या दोन्ही संशयितांना बोईसर (जि. पालघर) येथून ताब्यात घेतले.  

​आंतरराज्यीय गुन्हेगारी उघड

संशयितांची सखोल चौकशी केली असता, त्यांच्यावर नाशिक, ठाणे, रायगड, अमरावती, जालना, कोपरगाव, पुणे आणि कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथील पोलीस ठाण्यांमध्ये (Police Station) चोरी व घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. संशयितांकडून १६ तोळे सोन्या-चांदीचे दागिने (चालू बाजारभाव २१ लाख ११ हजार रुपये), चोरीचे सोने विकून खरेदी केलेला मुद्देमाल, ८ मोबाईल आणि लॅपटॉप हस्तगत करण्यात आला आहे.  

यांनी केली कारवाई

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत, पोलीस निरीक्षक अविनाश नडविनकेरी आणि अंबड गुन्हे शोध पथकाने केली आहे. या कारवाईमुळे घरमालकांनी भाडेकरू ठेवताना पोलिसांकडे त्यांची योग्य माहिती व नोंदणी करणे किती आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.  

ताज्या बातम्या

Maharashtra News : साकीनाका दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai साकीनाका येथील खैरानी रोडवर घडलेल्या दुर्घटनेचे पडसाद गुरुवारी विधानसभेत (Vidhansabha) उमटले. या दुर्घटनेत उघड्या गटारात पडून ६० वर्षीय अस्लम इसाक...