Thursday, May 2, 2024
Homeनगरमागील वादाच्या कारणातून खून करुन मृतदेह नदीत टाकला

मागील वादाच्या कारणातून खून करुन मृतदेह नदीत टाकला

मृत तरुण व आरोपी गंगापूर तालुक्यातील; नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

टोका येथे आढळलेल्या अज्ञात तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटली

- Advertisement -

नेवासा (शहर प्रतिनिधी) – नेवासा तालुक्यातील टोका-प्रवरासंगम येथे नदीपात्रात सोमवारी आढळलेल्या अज्ञात तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटली असून मागील वादाच्या कारणातून गंगापूर तालुक्यातील तरुणाची हत्या करून मृतदेह नदीपात्रात फेकल्या प्रकरणी किरण सुभाष हिवाळे (वय 23) रा. भीवधानोरा ता. गंगापूर याच्या वडिलांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, सोमवारी सकाळी तालुक्यातील टोका येथील प्रवरा नदीपात्रात तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. नेवासा पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. सदर मृतदेहाची तपासणी केली असता किरण सुभाष हिवाळे या नावाची पावती त्याच्या खिशात सापडल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सदर तरुण गंगापूर तालुक्यातील भीवधानोरा येथील असल्याचे स्पष्ट झाले.

भीवधानोरा येथे हिवाळे राहत असलेल्या दलित वस्तीमध्येच कानिफ माणिक मावस हा चोरून दारू विक्रीचा धंदा करत होता. एक वर्षांपूर्वी किरण याने वस्तीतील तरुण बिघडत असल्याचे कारण देत मावस यास वस्तीत दारू विक्री करू नका असे सांगितल्यानंतर मावस व त्याचा मित्र अशोक तुपे (रा. भेंडाळा ता. गंगापूर) यांनी किरणला मारहाण केली. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्यात दोघांना अटक करण्यात आली होती. जामिनावर सुटल्यानंतर त्या दोघांनी किरण यास तुझ्यामुळे जेल मध्ये बसावे लागले असून तुझा काटा काढणार असल्याचे फोनवर तसेच समक्ष भेटून दमबाजी केली.

किरण हा भेंडाळा येथील एका हॉटेलवर वेटर म्हणून काम करत होता तो मागील आठवड्यात घरी आल्यानंतर त्याने वडिलांना सदर माहिती सांगितली त्यानंतर दोन दिवस राहून तो पुन्हा हॉटेलवर कामासाठी गेला मात्र तीन दिवसांपासून त्याचा फोन लागत नव्हता. दरम्यान किरणचा मृतदेह प्रवरानदी पात्रात आढळून आल्याची माहिती हिवाळे यांना सोमवारी सायंकाळी समजल्यानंतर त्यांनी नातेवाईकांसह नेवासाफाटा येथील ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन पाहणी केली असता सदरचा मृतदेह किरणचा असल्याची खात्री पटली.

मृत किरण याच्या हाताला व गळ्याला दावे बांधून त्या दाव्याला दगड बांधलेला होता तसेच पोटाच्या बाजूला कशाने तरी खुपसल्याच्या खुणा दिसत होत्या. मृतदेह पाण्यात भिजल्याने फुगलेल्या अवस्थेत प्रवरासंगम प्रवरा नदी वरील पुलाखाली आढळून आला असल्याचे पोलिसांनी मृत किरण याच्या वडिलांना सांगितले.

याबाबत मृत किरणचे वडील सुभाष हिवाळे यांनी मागील केसच्या कारणावरून जीवे ठार मारण्याची धमकी देणार्‍या कनिफ माणिक मावस (रा. भीवधानोरा ता. गंगापूर) व अशोक तुपे (रा. भेंडाळा ता. गंगापूर) या दोघांवर संशय व्यक्त करत यांच्याविरुद्ध नेवासा पोलिसात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी वरील दोघांवर गुन्हा रजिस्टर फर्स्ट 28/2019 भारतीय दंड विधान कलम 302, 201, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पी. के. शेवाळे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या