Saturday, July 4, 2026
Homeनगरमागील भांडणाच्या कारणावरून माळीचिंचोरे येथे तुंबळ हाणामारी

मागील भांडणाच्या कारणावरून माळीचिंचोरे येथे तुंबळ हाणामारी

तलवारीने वार; 10 जण जखमी; दोन्ही बाजूच्या 11 जणांवर गुन्हा दाखल

नेवासा (तालुका प्रतिनिधी) – नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा येथे वर्षभरापूर्वी झालेल्या भांडणाच्या वादातून दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली असून लोखंडी गजाने मारहाण तसेच तलवारीने वार केले गेले. यात एका बाजूचे 7 दुसर्‍या बाजूचे 3 जण जखमी झाले असून या हाणामारी प्रकरणी दोन्ही बाजूने परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, दंगल, मारहाण करून हाड मोडले, आर्म अ‍ॅक्ट आदी गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. दोन्ही बाजूच्या एकूण 11 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

- Advertisement -

पहिली तक्रार ज्ञानेश्वर रामदास वाघमारे (वय 23) धंदा-खासगी नोकरी, रा, माळीचिंचोरा ता. नेवासा यांनी दाखल केली असून त्यात म्हटले की, माझे काका चंद्रकांत आंबाडे यांच्याकडे राहत असून पुण्यातील एका कंपनीत कामास आहे. लॉकडाऊनमुळे कंपनी बंद असल्याने मी माझे काका व मावशीसह मामा अशोक साहेबराव गुजर यांच्याकडे गेल्या काही महिन्यांपासून माळीचिंचोरा येथे राहत आहे.

राजाबापू नाथा शेंडे यांच्याशी गेल्या एक वर्षापूर्वी आमचे भांडण झाल्याने माझे मामा अशोक साहेबराव गुजर यांनी मला कामास पुण्यास पाठवून दिले होते. त्यानंतर मी पहिल्यांदाच माळीचिंचोरा येथे आलो आहे. 8 मे रोजी सकाळी मी व माझा भाऊ सचिन असे राहत असलेल्या घरासमोर गप्पा मारत होतो. त्यावेळी तेथे बापुसाहेब राजाबापू शेंडे, विष्णू राधाकिसन शेंडे, महेश राधाकिसन शेंडे, उमेश राधाकिसन शेंडे, किरण गणपत शेंडे, पप्पू रामहरी शेंडे, दर्वेश बापूसाहेब शेंडे सर्व रा. माळीचिंचोरा ता. नेवासा असे अचानक घरासमोर आले व मागील जुन्या भांडणाचा राग मनात धरून आम्हाला शिवीगाळ करू लागले.

तुम्ही येथे विनाकारण शिवीगाळ का करत आहेत असे म्हणाल्याचा त्यांना राग आल्याने बापूसाहेब राजाबापू शेंडे याने त्याच्या हातातील तलवारीने माझ्या डोक्यावर वार करून मला गंभीर जखमी केले. माझ्या डोक्यावर गंभीर मार लागल्याने माझा भाऊ सचिन हा मला सोडवण्यासाठी येत असताना विष्णू राधाकिसन शेंडे याने भाऊ सचिन यास धक्काबुक्की करून खाली पाडून त्याच्या हातातील तलवारीने डोक्यावर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी महेश राधाकिसन शेंडे, उमेश राधाकिसन शेंडे दोघे जोराने आरडाओरड करून म्हणाले, तुम्हाला आज जिवंत सोडणार नाही, तुमचा काटा काढून टाकू.

तेव्हा माझे काका चंद्रकांत आंबडे, मावशी, आजी, भाऊ किरण रामदास वाघमारे व मामे बहीण आमचा आरडाओरडा ऐकून येथे पळत आले असता महेश शेंडे, उमेश शेंडे यांनी त्यांच्या हातातील लोखंडी रॉडने आजीच्या उजव्या हातावर मारहाण करून गंभीर दुखापत केली. तेव्हा माझा भाऊ किरण वाघमारे हा आजीकडे धावत जात असताना त्यास किरण गणपत शेंडे व हरी गणपत शेंडे यांनी त्याला लथाबुक्क्यांनी मारहाण करून खाली पाडले व त्यांच्या हातातील लोखंडी रॉडने त्याच्या डाव्या हातास,डोक्यास मारहाण करून दुखापत केली.

त्यावेळी माझे काका चंद्रकांत आंबडे यांना विष्णू राधाकिसन शेंडे याने त्याच्या हातातील तलवारीने वार करून डाव्या हाताच्या पंजास गंभीर दुखापत केली. त्यांच्या हातातील पंजातून रक्तस्राव होऊ लागल्याने त्यांनी आरडाओरडा केला. माझी मावशी, बहीण या माझ्या काकांकडे आल्या असता त्यांना पप्पू रामहरी शेंडे व दर्वेश बापूसाहेब शेंडे यांनी शिवीगाळ करून लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. वरील सर्वजण निघून गेल्यावर लगेच माझे मामा अशोक साहेबराव गुजर, मोठा भाऊ रवी रामदास वाघमारे यांनी आम्हा सर्वांना खासगी गाडीत टाकून श्वास हॉस्पिटल नेवासा फाटा येथे औषध उपचाराकामी आणून अ‍ॅडमिट केले.

वरील फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी वरील 8 जणांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 307, 326, 325, 324, 447, 143, 147, 148, 149, 323, 504, 506, आर्म अ‍ॅक्ट 4/25 सह मुंबई पोलीस कायदा कलम 37(1)(3) व उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दुसरी फिर्याद विष्णू राधाकिसन शेंडे (वय 26) धंदा – शेती रा. माळीचिंचोरा ता. नेवासा यांनी दिली असून त्यात म्हटले की, सुमारे एक वर्षापूर्वी आमचे गावातील अशोक गुजर याचा भाचा ज्ञानेश्वर रामदास वाघमारे याचेशी भांडण झाले होते. मी माझा भाऊ उमेश असे आम्ही ज्ञानेश्वर रामदास वाघमारे यास व्यवस्थित रहा असे समजावून सांगितले होते. त्यावेळेस आमच्यात शाब्दीक वाद झाले होते, त्यानंतर तो गाव सोडून बाहेरगावी निघून गेला होता.

दि. 8 मे रोजी सकाळी माझा भाऊ उमेश राधाकिसन शेंडे हा गावात असताना त्याला ज्ञानेश्वर याने शिवीगाळ केली. तुम्ही मला एक वर्षापूर्वी दमदाटी केली होती, मी ते विसरणार नाही. म्हणून दमबाजी केली होती. नंतर भाऊ उमेश हा घरी आला त्याने सांगितले की, ज्ञानेश्वर रामदास वाघमारे याने मला जुन्या भांडणाच्या कारणावरून शिव्या व दमबाजी केली.त्यामुळे मी व माझा भाऊ उमेश असे अशोक गुजर याचे घरी गेलो. तेव्हा तेथे रामदास वाघमारे याने किरण रामदास वाघमारे, सचिन रामदास वाघमारे सर्व रा. माळीचिंचोरा ता. नेवासा हे भेटले.

तेव्हा मी ज्ञानेश्वर यास तुम्ही माझ्या भावाला शिवीगाळ का केली? असे विचारले असता ज्ञानेश्वर याने मला शिव्या व दमबाजी करण्यास सुरुवात केली, व त्यांनी त्याच्या हातातील कुर्‍हाडीने माझ्या डोक्यात मारले. डाव्या खांद्यावर मारले. सचिन व किरण यांनी मला लाथाबुक्क्याने मारहाण केली, भाऊ उमेश सोडविण्यास आला असता त्यास वरील तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. ज्ञानेश्वर याने भाऊ उमेश याच्या डाव्या खांद्यावर मारले. मला कुर्‍हाडीचा मार लागल्याने रक्तस्त्राव होऊ लागल्याने मी खाली पडलो.

त्याठिकाणी सुभाष चिंधे, अशोक चिंधे, विजय कचरु देव्हारे, यांनी सोडवासोडव केली, नंतर माझा पुतण्या वैभव रामहरी शेंडे यांने मोटारसायकलवरून आम्हा दोघांना एफजेएफएम हॉस्पिटल वडाळाबहिरोबा येथे आणले व उपचार सुरू केले. शेंडे यांचे बंधू उमेश यास वडाळा हॉस्पिटलमध्ये आणले. सध्या आम्ही दोघेजण वडाळा येथील मिशन हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहोत. या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी ज्ञानेश्वर रामदास वाघमारे, सचिन रामदास वाघमारे व किरण रामदास वाघमारे या तिघांवर भारतीय दंड विधान कलम 324, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक श्री. मोढवे करीत आहेत.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...