Thursday, May 2, 2024
Homeनगरजामखेड शहरातील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण

जामखेड शहरातील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण

आ. पवार यांची माहिती : प्रशासकीय अधिकार्‍यांसमवेत बैठक

जामखेड (तालुका प्रतिनिधी)- आरोग्याच्यादृष्टीने करोनाचा फैलाव रोखण्यासाठी जामखेड शहरातील प्रत्येक कुटुंबियांचा सर्व्हे करून आरोग्य तपासणी करण्याचे काम सुरू आहे. प्रशासन आरोग्याच्या बाबतीत कुठेही कमी नाही. नगर जिल्ह़््यातील जामखेड शहरात सर्वात जास्त रुग्ण सापडले आहेत, पण सर्वात जास्त करोना चाचणी जामखेडमध्ये करण्यात आल्या असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

शहरातील करोना बाधितांची संख्या 17 वर जाऊन पोहचली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या नकाशावर जामखेड शहराचे नाव येत आहे. शहरातील परीस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. याच अनुषंगाने सोमवारी (दि. 27) दुपारी आमदार पवार यांच्या उपस्थितीत सर्व प्रमुख अधिकार्‍यांची बैठक झाली. बैठकीतील निर्णयाची माहिती आ. पवार यांनी नंतर पत्रकार परिषद घेऊन दिली.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. पोखर्णा, आरोग्य अधिकारी डॉ. युवराज खराडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील बोराडे, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप आदी उपस्थित होते.

आमदार पवार म्हणाले, जामखेड शहरात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक बाब आहे. पंरतु लोकसंख्येच्या तुलनेत राज्यात सर्वात जास्त करोना चाचण्या जामखेड शहरात झाल्या आहेत. शहरात पॉझिटिव्ह सापडलेल्या भागात दाटीवाटीने वस्ती आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह संख्या जास्त दिसत आहे. तरीही आता सर्व शहर नियंत्रणात आणले असून कोणीही बाहेरचा व्यक्ती शहरात येणार नाही व शहरातील व्यक्ती बाहेर जाणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.

अत्यावश्यक सेवा घरपोहच मिळणार असल्याने नागरिकांनी आणखी काही दिवस आचारसंहिता पाळली तर या रोगावर मात करू शकू. आशा सेविकांमार्फत सारीचाही सर्वे सुरू आहे. प्रशासन अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहे. दाटीवाटीने लोक या भागात असल्यामुळे काम करताना अडचणी निर्माण होत आहेत. आतापर्यंत 185 लोकांच्या चाचण्या केल्या आहेत. त्यापैकी 17 पॉझिटिव्ह आले आहेत. यातील सहा रुग्ण ठणठणीत बरे झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. दहा लोक नगर येथे उपचार घेत आहेत. आणखी 13 रिपोर्ट येणे शिल्लक आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर म्हणाले, जिल्ह्यात करोनाची सुरूवात जामखेडपासूनच झाली. करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील सर्वाची चाचणी आवश्यक आहे. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे. जिल्ह्यात करोना रुग्णांचे प्रमाण जास्त वाढत असले तरी मृत्यू दर फक्त एक टक्का आहे. पुढील 14 दिवस करोनाचा जिल्ह्यात एकही रुग्ण आढळला नाही, तर दिलासा आणि 28 दिवसात एकही बाधित आढळून आला नाही तरच आपला जिल्हा करोना मुक्त झाला, असे म्हणता येईल. त्यामुळे पुढील 28 दिवस नागरिकांनी घरातच राहुन आरोग्याची काळजी घेणे व प्रशासनास सहकार्य करणे आवश्यक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या