Thursday, May 2, 2024
Homeनगरइंडोनेशियाचा कोरोनाबाधित व्यक्ती संपर्कात आल्याने खळबळ

इंडोनेशियाचा कोरोनाबाधित व्यक्ती संपर्कात आल्याने खळबळ

कोल्हार भगवतीपूर अलर्ट; अ‍ॅक्शन प्लान प्रारंभ; मायक्रो सर्च मोहीम सुरू; लॉकडाऊन आता 3 दिवसांचा

कोल्हार (वार्ताहर)- इंडोनेशियाची तबलिक जमातीच्या एका कोरोनाबाधित व्यक्तीने कोल्हार येथील मस्जिदमध्ये वास्तव्य केल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या प्रवरा परिसरातील 5 गावातील 25 संशयित व्यक्तींना तपासणीसाठी नगरला हलविले. यामुळे परिसरात खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणखी अलर्ट झाली असून अ‍ॅक्शन प्लान प्रारंभ झाला.

- Advertisement -

याअंतर्गत आरोग्य केंद्राकडून क्विक मायक्रो सर्च मोहीम सुरू झाली. कोल्हार बुद्रुक आणि भगवतीपुर ग्रामपंचायतीने संपूर्ण कडकडीत लॉकडाऊन आता 2 दिवसांवरून 3 दिवसांवर केल्याचे निर्देश दिले आहे. 25 जणांचा कोरोनाबाबतचा अहवाल काय येतो? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असून त्यानंतर पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.

इंडोनेशियाची कोरोनाबाधित व्यक्ती 10 ते 12 दिवस कोल्हार भगवतीपूर, पाथरे बुद्रुक, हसनापूर, दाढ व लोणी येथे एकूण दहा दिवस वास्तव्यास होती. शुक्रवारी रात्री कोल्हार प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लोणी पोलीस स्टेशनच्या संपूर्ण अधिकारी व पोलीस कर्मचार्‍यांनी या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या वरील 5 गावातील 25 संशयितांना येथे आणून जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे कोरोना तपासणीकरिता रवाना केले. यामध्ये कोल्हार 7, पाथरे बुद्रुक 4, हसनापूर 6, दाढ 5 व लोणी येथील 3 व्यक्तींचा समावेश आहे. हे वृत्त दैनिक सार्वमतमध्ये झळकताच सर्वत्र खळबळ उडाली.

कोल्हार प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय घोलप यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल शनिवारी राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्विक मायक्रो सर्वेक्षण अर्थात जलद सूक्ष्म सर्वेक्षण या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. ज्या ज्या भागांमधील संशयित कोरोना तपासणीकरिता नगरला नेले.

त्या प्रत्येक भागातील घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीचे सर्वेक्षण करण्यात येईल. सदर घरांमध्ये ज्या व्यक्तीला सर्दी, खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास होत असेल अशी व्यक्ती आढळल्यास त्वरित कोल्हार प्राथमिक आरोग्य केंद्रात संदर्भीय करण्याच्या सूचना आशा सेविकांना देण्यात आल्या. याचदरम्यान सर्व नागरिकांना कोरोनाविषयी खबरदारी घेण्याबद्दल जनजागृती केली जाईल.

या मोहिमेअंतर्गत महिला आशा सेविकांची कोल्हार भगवतीपूर आणि पाथरे बुद्रुक या दोन गावांसाठी 15 जणांची टीम तयार करण्यात आली. त्यांना सर्वेक्षणाबाबत इत्यंभूत प्रशिक्षण डॉ. घोलप यांनी दिले.

यावेळी गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, डॉ. विखे कारखान्याचे संचालक स्वप्निल निबे, कोल्हार बुद्रुकचे ग्रामविकास अधिकारी शशिकांत चौरे उपस्थित होते. काल शनिवारी सोडियम हायपो क्लोराईडची धूर फवारणी आरोग्य केंद्र व संपूर्ण गावात निर्जंतुकीकरणाच्या हेतूने करण्यात आली. आतापर्यंत येथील आरोग्य केंद्राने 154 जण क्वारंटाईन केले आहेत.

कोल्हार बुद्रुक आणि भगवतीपूर ग्रामपंचायतने या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळपासून ते रविवारी रात्री 12 वाजेपर्यंत नियोजित केलेला आवश्यक सेवेच्या दुकानांसह संपूर्ण कडकडीत लॉकडाऊन आणखी एका दिवसाने वाढवून सोमवारी रात्री 12 वाजेपर्यंत असा 3 दिवसांचा केला आहे. पोलीस यंत्रणाही अलर्ट झाली असून विनाकारण बाहेर फिरणार्‍या व लॉकडाऊनचे उल्लंघन करणार्‍या काही महाभागांवर 188 कलमान्वये प्रतिबंधात्मक कारवाई केली. यातून नियमांचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तींना निश्चित चपराक बसावी अशी अपेक्षा संतप्त नागरिकांनी व्यक्त केली.

कोल्हार बुद्रुकचे ग्रामविकास अधिकारी शशिकांत चौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर जमातीच्या प्रार्थनास्थळास सध्या कुलूप लावण्यात आले असून येथील संपूर्ण परिसर बॅरेगेट लाऊन पूर्ण सील केला आहे. तसेच या गावातील सर्व प्रार्थनास्थळे आणि दर्गे सॅनिटाईझरने निर्जंतुकीकरण करण्यात आले. भगवतीपूर ग्रामपंचायतने गावातील वाड्या वस्त्यांवर औषध फवारणी केली.

लॉकडाऊनच्या काळात काही तरुण मुद्दाम दुचाकींवर गावात, गल्ली बोळात फिरतात. अशा महाभागाविषयी गावातील सर्वस्तरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशासाठी जेव्हापासून देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित झाला, तेव्हापासून गावातील सर्व रस्ते, गल्ली बोळ स्थानिक नागरिकांनी यापूर्वीच स्वतः बॅरेगेट लावून बंद केले. ग्रामपंचायतने असेच बॅरेगेट लावून गावातील प्रमुख रस्ते बंद केले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या