Thursday, May 2, 2024
Homeनगरव्यापारी बँकेच्या कर्जमाफीच्या रक्कमेत 13 कोटींनी वाढ

व्यापारी बँकेच्या कर्जमाफीच्या रक्कमेत 13 कोटींनी वाढ

15 हजार शेतकर्‍यांचे आधार प्रामाणिकरण शिल्लक

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील महाआघाडी सरकारने शेतकर्‍यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत बुधवार अखेर नगर जिल्ह्यातील पात्र शेतकर्‍यांसाठी 1 हजार 386 कोटी रुपये जिल्हा बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकेच्या खात्यावर जमा झाल्याची माहिती सहकार विभागाकडून देण्यात आली.

- Advertisement -

दरम्यान पात्र शेतकर्‍यांच्या आधार प्रमाणिकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून अवघ्या 15 हजार शेतकर्‍यांच्या कर्ज खात्याचे प्रामाणिकरण शिल्लक आहे. मंगळवारी सुट्टी असल्याने बुधवारी झालेल्या कामकाजात जिल्हा बँकेच्या कर्जमाफीचा आकडा जैसे थे होता. मात्र, व्यापारी बँकांमधील शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी 13 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीची प्रक्रिया जिल्ह्यात सुरू आहे. जिल्हा बँकेच्या कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांसाठी सोमवारपर्यंत 1 हजार 167 रुपयांचा निधी जमा झाला होता. यातून बँकेच्या 2 लाख 60 हजार 181 शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे. तर राष्ट्रीयकृत बँकांच्या 19 हजार 954 शेतकर्‍यांसाठी 206 कोटींचा निधी प्राप्त होता.

यात वाढ होवून बुधवारी 21 हजार 249 शेतकर्‍यांसाठी 219 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. म्हणजे बुधवारी कर्जमाफी योजनेत व्यापारी बँकांना 13 कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याची माहिती सहकार विभागाकडून देण्यात आली. तसेच कर्जमाफीस पात्र असणार्‍या शेतकर्‍यांच्या आधार प्रामाणिकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत 95 टक्के शेतकर्‍यांच्या कर्ज खात्याचे आधार प्रामाणिकरण झाले असून अवघ्या 15 हजार शेतकर्‍यांच्या कर्ज खात्याचे आधार प्रमाणिकरण बाकी असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या